पुणे, 11 ऑगस्ट 2024: फॉर्मात असलेल्या क्रीडा प्रबोधिनीने हॉकी पुणे लीग 2024-25 स्पर्धेत वर्चस्व गाजवताना सीनियर आणि ज्युनियर डिव्हिजनचे जेतेपद पटकावले.
नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी एकतर्फी फायनलमध्ये क्रीडा प्रबोधिनीने जीएसटी आणि सेंट्रल एक्साइज, पुणे संघाचा 5-1 असा पराभव करत सीनियर डिव्हिजनच्या विजेतेपदावर नाव कोरले. सचिन राजगोडे (10वा), रोहन पाटील (15वा), राहुल शिंदे (20वा), सचिन कोळेकर (21वा), सागर शिंगुडेचे (30वा) मैदानी गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. जीएसटी आणि सेंट्रल एक्साइजकडून एकमेव गोल तालीब शहाने (59व्या) केला.
तिसर्या स्थानासाठीच्या लढतीत, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पुणे संघाने मध्य रेल्वे, पुणेला 3-2 असे पराभूत केले. विजयी संघाकडून श्री किशनने (3रा) पेनल्टी स्ट्रोकद्वारे गोलांचे खाते उघडले. त्यानंतर आकाश राजने (53व्या) पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करताना आघाडी वाढवली. राज पाटीलने (57व्या) त्यात आणखी भर घातली. मध्य रेल्वेकडून दोन्ही गोल स्टीफन स्वामीने (6व्या, 17व्या मिनिटाला-पीसी) केले.
ज्युनियर डिव्हिजनमधील अंतिम लढतही एकतर्फी झाली. त्यात क्रीडा प्रबोधिनीने फ्रेंड्स युनियन क्लबचा 7-0 असा धुव्वा उडवला.सोहम काशीद (42वे), सलमान अंबी (43वे), गौरव पाटील (43वे-पीसी), सूरज शुक्ला (45वे, 59वे), कार्तिक पठारे (54वे) आणि दीपक चव्हाणची (57वे) कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. फ्रेंड्स युनियनकडून एकही गोल झाला नाही.
तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यात, हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लबने पूना स्पोर्ट्स अकॅडमीचा 3-2 असा पराभव केला. ओंकार अंजीर (27वे), निहाल गोरटकर (44वे), आकाश बेलितकरने (50वे) प्रत्येकी एक गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रतिस्पर्धी संघाकडून मनोज पिल्ले (47वे- पीसी), रोनक येडेल्लू (56 वे) यांनी गोल केले.
माजी ऑलिंपियन राहुल सिंग यांच्या हस्ते ब्ग्क्षीस समारंभ झाला. यावेळी त्यांचे सहकारी आणि माजी ऑलिंपियन विक्रम पिल्ले, माजी आंतरराष्ट्रीय आणि जीएसटी उपायुक्त धनंजय महाडिक, हॉकी पुणेचे मानद सचिव आणि हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनोज भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पीसीएमसीचे क्रीडा उपआयुक्त पंकज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
निकाल –
सीनियर डिव्हिजन
अंतिम फेरी: क्रीडा प्रबोधिनी: 5 (सचिन राजगोडे 10वे; रोहन पाटील 15वे; राहुल शिंदे 20वे; सचिन कोळेकर 21वे; सागर शिनगुडे 30वे) विजयी जीएसटी आणि सेंट्रल एक्साइज, पुणे: 1 (तालिब शहा 59वे). हाफटाईम: 0-0.
तिसरे स्थान: फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया, पुणे: 3 (श्री किशन 3रा – पीएस; आकाश राज 53 वा -पीसी; राज पाटील 57 वा) विजयी वि. मध्य रेल्वे पुणे: 2 (स्टीफन स्वामी 6 वा, 17 – पीसी). हाफटाईम: 1-2
ज्युनियर डिव्हिजन
अंतिम फेरी, क्रीडा प्रबोधिनी: 7 (सोहम काशीद 42वे; सलमान आंबी 43वे; गौरव पाटील 43वे – पीसी; सूरज शुक्ला 45वे, 59वे; कार्तिक पठारे 54वे; दीपक चव्हाण 57वे) विजयी वि. फ्रेंड्स युनियन क्लब: 0. हाफटाईम: 0.
तिसरे स्थान: हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लब: 3 (ओंकार अंजीर 27वे; निहाल गोरटकर 44वे; आकाश बेलितकर 50वे) विजयी वि. पूना स्पोर्ट्स अकॅडमी: 2 (मनोज पिल्ले 47वे- पीएस; रोनक येडेल्लू 56वे). हाफटाईम: 1-0