इंग्लंड येथे सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तान संघावर ९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. याबरोबर भारतीय संघाने इंग्लंड, विंडीज पाठोपाठ पाकिस्तानला पराभूत करत ३ सामन्यात ६ गुणांची कमाई केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ९ विकेट्सच्या बदल्यात ५० षटकात १६९ धावा केल्या. त्यात पूनम राऊतने सर्वोच्च धावा करताना ४८ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून नश्रा संधूने १० षटकात २६ धावा देत ४ बळी मिळवले.
१७० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अतिशय खराब झाली शेवटपर्यँत ते सावरून शकले नाहीत. ३८.१ षटकात पाकिस्तानचा डाव ७४ धावांवर संपुष्टात आला. त्यात एकता बीस्तने १० षटकात १८ धावा देत ५ बळी मिळवले. तिलाच सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
हा भारताचा पाकिस्तानवरील सलग १०वा विजय होता. आतापर्यँत भारतीय महिला संघ कधीही पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामन्यांत पराभूत झालेला नाही.
भारताचा पुढील सामना श्रीलंका संघाविरुद्ध ५ जुलै रोजी आहे.