सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात एक नेपाळी वेगवान गोलंदाज ‘गुलशन झा’ आपल्या अफलातून बाउन्सरने फलंदाजाला चकित करतो आहे. या व्हिडिओला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाह येत असून, हा व्हिडिओ त्यांच्या पसंतीस उतरत आहे. या एका बाऊन्सरमुळे गुलशनला नेपाळच्या राष्ट्रीय संघामध्ये समाविष्ट करण्याची जोरदार चर्चा होत आहे.
अलीकडेच गुलशन ‘काठमांडू मेयर्स चषकात’ नेपाळ पोलिस संघाकडून खेळत होता. एकाच वर्षी झालेल्या काठमांडू मेयर्स कप स्पर्धेत गुलशनने दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजीचे कौशल्य दाखवले. विशेषत: आर्म्ड पोलिस फोर्स क्लबविरुद्धच्या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि 7 षटकांत 36 धावा देऊन 4 बळी घेतले. गुलशनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्याचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी झाला. याच सामन्यादरम्यान गुलशनने विरोधी संघाचा फलंदाज खडक बोहोराला एक बाऊन्सर टाकला, ज्यामुळे तो रातोरात स्टार गोलंदाज बनला. त्याच्या या बाऊन्सरला ‘पर्फ्यूम बॉल’ असे म्हणतात.
सामन्यात गुलशनने काठमांडू महापौर इलेव्हनचा फलंदाज खडक बोहोराला जबरदस्त बाऊन्सर टाकला, जो त्याच्या हेल्मेटच्या अगदी जवळून गेला. गुलशनने फेकलेला हा बाउंसर इतका वेगवान होता की, त्याची तुलना बंदुकीच्या गोळीशी करता आली असती. ज्याने हा बाउंसर पाहिला ते अवाक् झाला आहे. गुलशनची गोलंदाजीची गती आणि बाउन्सर पाहून नेपाळचे निवड समिती सदस्यही आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या या बाऊन्सरबद्दल बरीच चर्चा होतांना दिसत आहे.
Gulshan Jha
New Recruit of Team Nepal for #CWCL2 & the series with PNG.@sourabhsanyal @Bibhu237@vmanjunath @Arnavv43 @arunbudhathoki @TheBiddhut @Fancricket12 #KTMMayorsCup pic.twitter.com/xdQj7sfuuW— Sagar poudel (@MalaiBalBho) August 21, 2021
या जबरदस्त गोलंदाजीमुळे गुलशनला नेपाळच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. तो आत्तापर्यंत फक्त दोन देशांतर्गत सामने खेळला आहे. आता गुलशन सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि ओमानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत नेपाळच्या राष्ट्रीय संघाकडून खेळेल. 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान ओमानमध्ये ही तिरंगी मालिका होणार आहे. ओमानमधील तिरंगी मालिकेमध्ये ज्ञानेंद्र मल्ला नेपाळचे कर्णधारपद भूषवणार आहे. तिरंगी मालिकेपूर्वी नेपाळच्या संघाला आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग-2 अंतर्गत पापुआ न्यू गिनीविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछानेने जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. संदीपने आतापर्यंत 10 एकदिवसीय आणि 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या कारकिर्दीत एकूण 70 विकेट्स नोंदवल्या आहेत. लामिछानेने आपल्या कारकिर्दीत एकूण 101 ट्वेंटी ट्वेंटी सामनेही खेळले आहेत आणि या दरम्यान त्याने 138 बळी घेण्यात यश मिळवले आहे. लामिछाने नेपाळ क्रिकेटमधील स्टार फिरकीपटू आहे. आता लामिछानेनंतर गुलशन वेगवान गोलंदाज म्हणून जागतिक क्रिकेटवर आणखी प्रभाव टाकू शकतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी फलंदाजाचे विंडीजविरुद्ध झंझावती शतक; गावसकर, गांगुलीसारख्या दिग्गजांवर ठरला वरचढ
चेतन सकारियाला फ्रँचायझीने विचारला घरचा पत्ता, गोलंदाजाचे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल
‘गुरुजीं’नी जे ठरवलं ते केलंच! रोहित शर्माला कसोटी फलंदाज बनवण्यात शास्त्रींचा मोठा वाटा