मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. हा सामना या दोन देशांतील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी मंगळवारी(२९ डिसेंबर) भारताने ८ विकेट्सने विजय मिळवत ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाने भारताला ७० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने १५.५ षटकात पूर्ण केले. भारताकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि शुबमन गिल नाबाद राहिले.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १०३.१ षटकात २०० धावांवर संपूष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ६९ धावांची आघाडी घेतली आणि भारतासमोर सामना जिंकण्यासाठी ७० धावांचे लक्ष्य ठेवले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिल्या २ विकेट्स लवकर गमावल्या आहेत. भारताने पहिली विकेट मयंक अगरवालच्या रुपात गमावली. मयंक आणि शुबमन गिलने भारताच्या डावाची सुरुवात संयमी केली होती. मात्र पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिशेल स्टार्कने मयंकची विकेट घेतली. त्याने मयंकला यष्टीरक्षक पेनकडे झेल देण्यास भाग पाडले. मयंकने ५ धावा केल्या.
यानंतर चेतेश्वर पुजाराही पॅट कमिन्सने टाकलेल्या ६ व्या षटकात बाद झाला. ३ धावांवर त्याचा झेल ग्रीनने घेतला.
मात्र यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि शुबमन गिलने भारताचा डाव सांभाळत अर्धशतकी भागीदारी केली आणि भारताला सामना जिंकून दिला. रहाणेने नाबाद २७ धावा केल्या तर गिलने नाबाद ३५ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर संपुष्टात –
या डावात ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर कमिन्सने २२ धावांची छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. तत्पूर्वी मॅथ्यू वेडने ४० धावांची खेळी केली होती.
भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. उमेश यादवने १ विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियन शेपूट वळवळलं.
मंगळवारी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६७ षटकापासून ६ बाद १३३ धावांपासून खेळायला सुरुवात केली. या वेळी सुरुवातीला कॅमेरॉन ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी संयमी फलंदाजी केली. त्यांनी सुरुवातीच्या १० षटकात जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांना फार यश मिळू दिले नाही. त्यांनी या १० षटकात केवळ ११ धावा काढल्या. पण याबरोबरच सुरुवातीचा आव्हानात्मक वेळही खेळून काढला.
पुढील ७७ ते ८१ या ५ षटकातही या दोघांनी कोणतीही घाई न करता ५ धावाच केल्या. पण यामुळे ते हळू हळू ऑस्ट्रेलियाची आघाडी वाढवत होते. पण असे असतानाच ८३ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने कमिन्सला झेलबाद केले. कमिन्सचा झेल मयंक अगरवालने पकडला. त्यामुळे कमिन्स आणि ग्रीन यांच्यातील ७ व्या विकेटसाठीची ५७ धावांची भागीदारी तुटली. कमिन्स १०३ चेंडूत २२ धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर मिशेल स्टार्क फलंदाजीसाठी आला.
त्यानेही ग्रीनला चांगली साथ देताना ९० षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १७२ धावांपर्यंत पोहचवली. दरम्यान ग्रीनने काही आक्रमक फटके खेळले. मात्र त्याची झुंज ९१ षटकात संपुष्टात आली. त्याला सिराजने ९१ व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर बाद केले. त्याचा झेल मिड विकेटला असलेल्या रविंद्र जडेजाने घेतला. त्यामुळे १४६ चेंडूत ४५ धावा करुन ग्रीन माघारी परतला.
नॅथन लायन १० व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी स्टार्क आणि लायनला फार हालचाल करु दिली नाही. मात्र पहिल्या सत्रात नंतर लायन आणि स्टार्कने आणखी पुढील ६ षटकात पडझड होऊ दिली नाही. मात्र ९७ व्या षटकात लायनचा अडथळा सिराजने दूर केला. त्याने लायनला यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे लायन ९ धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर जोश हेजलवूड फलंदाजीसाठी आला. पण दरम्यान एकदा स्टार्क डीआरएसमुळे वाचला.
झाले असे की ९६ व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर जडेजाने पायचीतसाठी अपील केले. यावर डीआरएस रिव्ह्यू घेण्यात आला. त्यात स्टार्क नाबाद असल्याचे दिसले.
नंतर स्टार्क आणि हेजलवूडने ९८ षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाला ९ बाद १९३ धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र अखेर त्यांची झुंज १०४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आर अश्विनने हेजलवूडला बाद करत संपवली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर संपुष्टात आला.