येत्या तीन दिवसांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे भिडणार आहेत. या मैदानावर कसोटी मालिकेतील तिसरा सामना जिंकत दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असतील. परंतु भारतीय संघाचा सिडनीच्या मैदानावरील रिकॉर्ड जास्त विशेष नाही. या मैदानावरील मागील १२ कसोटी सामन्यांपैकी भारताने केवळ एक सामना जिंकला आहे. असे असले तरी, भारतीय फलंदाजांची या मैदानावरील आकडेवारी उल्लेखनीय आहे. आतापर्यंत भारतीय फलंदाजांनी या मैदानावर तब्बल १४ शतके केली आहेत. तर दोन फलंदाजांनी याच मैदानावर द्विशतक केले आहे.
द्विशतक करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडूलकर –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने २००४ मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात अविस्मरणीय खेळी केली होती. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद द्विशतकी खेळी केली होती. ४३६ चेंडूत ३३ चौकारांच्या मदतीने त्याने २४१ धावा केल्या होत्या.
रवि शास्त्री –
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री हे पहिले भारतीय फलंदाज होते, ज्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये द्विशतक केले होते. १९९२ मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्यांनी हा विक्रम केला होता. या सामन्यातील पहिल्या डावात सलामीला फलंदाजीला येत त्यांनी २०६ धावा केल्या होत्या. दरम्यान त्यांनी १७ चौकार आणि २ षटकार ठोकले होते.
शतक करणारे भारतीय फलंदाज
व्हिव्हिएस लक्ष्मण –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात २००४ मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना झाला होता. या सामन्यात माजी भारतीय फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मण याने ताबडतोब शतक ठोकले होते. त्याने २९८ चेंडूत १७८ धावांची दमदार खेळी केली होती. यात ३० चौकारांचा सामवेश होता. यावेळी लक्ष्मण आणि सचिन तेंडूलकर यांच्यात चौथ्या विकेटसाठी ३५३ धावांची भागिदारी झाली होती.
चेतेश्वर पुजारा –
भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा हा २०१८-१९मध्ये भारतीय संघाच्या ऐतिहासिक कसोटी विजयाचा नायक ठरला होता. ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान सिडनी येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना झाला होता. या सामन्यात पुजाराने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत २२ चौकारांच्या मदतीने १९३ धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला होता.
पुजारा पूर्ण कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याच्या कामगिरीमुळे भारताने २-१ ने ही मालिका जिंकली होती.
सुनिल गावसकर, के श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात जानेवारी १९८६ मध्ये सिडनी येथे तिसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्यात लिस्टल मास्टर सुनिल गावसकर, माजी भारतीय क्रिकेटपटू के श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांनी शतके ठोकली होती. गावकरांनी सलामीला फलंदाजीला येत १९ चौकार ठोकत १७२ धावा केल्या होत्या. तर श्रीकांत यांनी दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ११६ धावांची खेळी केली होती. यात त्यांच्या १९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तसेच अमरनाथ यांनी १० चौकार लगावत १३८ धावा केल्या होत्या.
या तिघांच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६०१ धावांचे लक्ष्य दिले होते. शेवटी सामना अनिर्णित राहिला होता.
महत्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! रोहित, पंतसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह
रोहित शर्मासाठी कुणाला मिळणार टीम इंडियातून डच्चू? ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला लागली उत्सुकता






