सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्याचा रविवारी(१० जानेवारी) चौथा दिवस असून ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र तो अर्धशतक करुन लगेचच बाद झाला. चौथ्या दिवसाखेर भारताने २ बाद ९८ धावा केल्या आहेत. अजूनही भारताला ३०९ धावांची आवश्यकता आहे.
धावांचा पाठलाग करताना भारताकडून सलामीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी आले होते. यावेळी त्यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनीही खुलून खेळ केला. दोघांनी १९ व्या षटकातच भारताला ५० धावांचा टप्पा पार करुन दिला होता. या दोघांची भागीदारी रंगेल असे वाटत असतानाच गिलला जोश हेजलवूडने २३ व्या षटकात बाद केले. गिलचा झेल यष्टीरक्षक टीम पेनने घेतला. गिलने ६४ चेंडूत ३१ धावा केल्या. यात ४ चौकारांचा समावेश आहे.
गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. त्याने रोहितला साथ देताना त्याचा नेहमीचा बचावात्मक खेळ करण्यावर भर दिला. दरम्यान ३० व्या षटकात नॅथन लायनच्या गोलंदाजीवर रोहितने चौकारासह त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ९४ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याच्या पुढच्याच षटकात तो पुल शॉट खेळण्याच्या नादात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल फाईन लेगला मिशेल स्टार्कने घेतला. त्यामुळे रोहितला ९८ चेंडूत ५२ धावांवर विकेट गमवावी लागली. या खेळीत रोहितने ५ चौकार आणि १ षटकार मारला.
तो बाद झाल्यानंतर मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पुजाराने आणखी धोका न पत्करता चौख्या दिवसाखेरपर्यंत सावध खेळ केला. भारताने चौथ्या दिवसाखेर ३४ षटकात २ बाद ९८ धावा केल्या असून अजून भारताला ३०९ धावांची विजयासाठी गरज आहे. सध्या कर्णधार अजिंक्य रहाणे ४ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा ९ धावांवर नाबाद खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव केला घोषित –
ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील ९४ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने ४०७ धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीन(८४), स्टिव्ह स्मिथ (८१) आणि मार्नस लॅब्यूशाने (७३) यांनी अर्धशतके झळकावली.
भारताकडून आर अश्विन आणि नवदीप सैनीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी १ विकेट घेतली.
दुसऱ्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाकडे ४०० पेक्षा अधिक धावांची आघाडी –
चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचीही ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ आणि ग्रीनने चांगली सुरुवात केली. स्मिथने त्याचा खेळण्याचा अंदाज बदलत आक्रमक खेळी करायला सुरुवात केली. मात्र असे असतानाच ६८ व्या षटकात आर अश्विनने स्मिथचा अडथळा दूर केला. त्याने स्मिथला या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पायचित केले. त्यामुळे स्मिथ १६७ चेंडूत ८१ धावांची खेळी करुन बाद झाला. या खेळीत स्मिथने १ षटकारासह ८ चौकार मारले.
स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची जबाबदारी कर्णधार टीम पेन आणि ग्रीनने घेतली. या दोघांनीही काहीसे आक्रमक खेळ करत संघाची धावसंख्या वाढवली. ८३ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर ग्रीनेन चौकार ठोकत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.
अर्धशतकानंतर ग्रीनने काही मोठे फटके खेळताना षटकार – चौकार मारले. मात्र अखेर ८७ व्या षटकात बुमराहने त्याला यष्टीरक्षक साहाकडे झेल देण्यास भाग पाडले. ग्रीनने १३२ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला पेनने उत्तम साथ दिली. या दोघांमध्ये १०४ धावांची ६ व्या विकेटसाठी भागीदारी झाली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दुसऱ्या सत्राखेर ८७ षटकात ६ बाद ३१२ धावा केल्या असून पेन ३९ धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडे ४०६ धावांची आघाडी आहे.
पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाकडे २७६ धावांची आघाडी –
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यांचे तिसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेली स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने ही जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. या दोघांनी सुरुवातीला चांगला खेळ केला. त्यांनी शतकी भागीदारीही पूर्ण केली. पण ही भागीदारी आणखी रंगेल असं वाटत असतानाच ४७ व्या षटकात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने लॅब्यूशानेला यष्टीरक्षक वृद्धिमान साहाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे लॅब्यूशाने ११८ चेंडूत ७३ धावा करुन बाद झाला. त्यापाठोपाठ लगेचच मॅथ्यू वेडही ४ धावांवर नवदीप सैनीच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्याचाही झेल यष्टीमागे उभ्या असलेल्या साहाने घेतला.
त्यानंतर मात्र युवा कॅमेरॉन ग्रीनने स्मिथला चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या सत्राखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाची आघाडी २५० च्या पुढे नेली होती. दरम्यान स्मिथने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ४ बाद १८२ धावा झाल्या. यावेळी स्मिथ ५८ तर ग्रीन २० धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील ९४ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडे २७६ धावांची आघाडी झाली आहे.