---Advertisement---

INDvAUS: मोहम्मद शमीच्या ‘त्या’ एका ओव्हरने पालटले सामन्याचे चित्र, व्हिडिओ पाहाच

On: सोमवार, ऑक्टोबर 17, 2022 2:36 PM
Shami, Kohli, Arshdeep Singh Axar Patel
---Advertisement---

टी20 विश्वचषकात (T20 Wold Cup)भारताने सोमवारी (17 ऑक्टोबर) यजमान ऑस्ट्रेलियाला सराव सामन्यात पराभूत केले. ब्रिसबेनच्या गाबा क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाचा नायक ठरला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. त्याने केवळ एक षटक टाकत सामन्याचा निकालच बदलला. या सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजीसोबत उत्तम क्षेत्ररक्षणही केले.

मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा टी20 विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. नंतर त्याला जसप्रीत बुमराहच्या जागी मुख्य संघात निवडले गेले. आश्चर्याची बाब म्हणजे तो 2021 टी20 विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाही. यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या सराव सामन्यात कशी कामगिरी करेल याकडे सर्व भारतीय चाहत्यांचे लक्ष होते. या सामन्यात तो बाहेर होता, मात्र कर्णधार रोहित शर्मा याने एकदम त्याला बोलावले आणि शेवटचे षटक दिले. या सामन्यात भारताने पूर्ण 15 खेळाडूंची नावे नाणेफेकीदरम्यान दिली होती.

शमीने 20व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित केला. त्याने षटकाच्या तिसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेतल्या. त्याने जोश इंग्लिस (1), पॅट कमिन्स (7), केन रिचर्डसन (0) यांना बाद केले. तसेच चौथ्या चेंडूवर ऍश्टन एगर याला शमीने दिनेश कार्तिकच्या साहय्याने धावबाद केले.

महत्वाचे, शमीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकच टी20 सामना खेळला, तोही ऑस्ट्रेलियात आणि त्याला ऑस्ट्रेलियात एकच टी20 सामना खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. 

तत्पूर्वी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. यावेळी भारताला पहिल्या पॉवरप्लेमध्येच रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. राहुलने 33 चेंडूत 57 धावा केल्या. रोहित (15), विराट कोहली (19), दिनेश कार्तिक (20) हे बाद झाल्याने धावांची गती कमी झाली. यामुळे भारत 150च्या तरी पुढे जाईल का अशी चिंता सतावत होती. त्याचवेळी सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत 50 धावा केल्या. यामुळे भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 186 धावसंख्या उभारली.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरूवात उत्तम केली. सलामीवीर मिशेल मार्श आणि कर्णधार ऍरॉन फिंच यांनी ताबडतोब खेळी करत पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मार्श 35 धावा करत बाद झाला. त्याच्यानंतर आलेला स्टिव्ह स्मिथ (11) याचा अडसर युझवेंद्र चहल याने त्याला त्रिफळाचीत करत दूर केला. अर्धशतकी खेळी करत खेळपट्टीवर टीकून असलेल्या फिंचला हर्षल पटेल याने बाद केले. फिंचने 54 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार खेचत 76 धावा केल्या.

ग्लेन मॅक्सवेल यालाही 23 वर भुवनेश्वर कुमार याने बाद केले. नंतर ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडतच राहिल्या. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या तीन षटकात तब्बल 6 विकेट्स गमावल्या. यावेळी भारताकडून भुवनेश्वर आणि शमी यांनी चांगली गोलंदाजी केली. शमीने तर एकच षटक टाकताना 4 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेपाठोपाठ वेस्ट इंडिजही गारद, स्कॉटलंडचा दोन वेळेच्या चॅम्पियनवर 42 धावांनी विजय
VIDEO:…आणि सर्वांच्या काळजात धस्स झालं! सूर्याच्या डोक्यावर आदळला स्टार्कचा घातक चेंडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---