अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात येत्या २४ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु होणार आहे. हा सामना सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम अर्थात मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असून या स्टेडियमचे उद्घाटन २४ फेब्रुवारीलाच पार पडेल.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सामन्याच्याआधी स्टेडियमचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते होणार आहे. यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत.
मोटेरा स्टेडियम हे पुर्नबांधणी केलेले स्टेडियम असून आता ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भारत आणि इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.
विशेष म्हणजे हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने दुपारी २.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्यामुळे त्याआधी सकाळी या स्टेडियमचे उद्घाटन पार पडेल.
भारतातील दुसराच दिवस – रात्र कसोटी सामना –
भारतातील हा दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी कोलकाताच्या इडन गार्डन या स्टेडियमवर पहिल्यांदा भारत विरुद्ध बांगलादेश संघात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता. तर भारतीय संघाचा हा एकूण तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ऍडलेड येथे देखील दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. तर इंग्लंड संघाचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असेल.
प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी –
भारत-इंग्लंड संघात होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यासाठी ५५ हजार प्रेक्षक उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. कारण या स्टेडियमची आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे.
चौथा सामनाही मोटेरा स्टेडियमवर –
भारत आणि इंग्लंड संघात होणारा चौथा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना देखील मोटेरा स्टेडियमवरच होणार आहे. हा सामना सर्वसाधारण कसोटी सामन्यासारखाच असल्याने सकाळी ९.३० वाजता सुरु होईल.
मोटेरा स्टेडियमवर झाले होते ट्रम्प यांचे स्वागत –
बरोबर १ वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रेम्प हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात अहमदाबाद येथे स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी मोटेरा स्टेडियमवर मोठा कार्यक्रमही घेण्यात आला होता.
मोटेरा स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अलीचे सामने –
काही दिवसांपूर्वीच या स्टेडियमवर भारतातील देशांतर्गत स्पर्धा सय्य्द मुश्ताक अली टी२० ट्रॉफीच्या बाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याच स्टेडियमवर तमिळनाडूने बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.
जगातील सर्वात मोठे स्टेडियम –
मोटेरा स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. त्याचबरोबर या स्टेडीयममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमी, क्लबहाउस आणि स्विमिंग पूल तसेच ७३ कॉर्पोरेट बॉक्स याचाही समावेश आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्पायडरमॅन, स्पायडरमॅन! जिममध्ये रिषभ पंतची मस्ती, पाहा मजेदार व्हिडिओ
श्रीलंकन क्रिकेटचा ‘शापित गंधर्व’ तिलकरत्ने दिलशान
अहमदाबाद कसोटीत उमेश यादव खेळणार का नाही? येत्या २ दिवसांत घेतला जाणार निर्णय






