---Advertisement---

IND v NZ 2nd T20: गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं; सलग दुसरी टी२० जिंकत भारताची मालिकेत २-०ने विजयी आघाडी

Rohit-Sharma-Venktesh-Iyer
---Advertisement---

शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना रंगला आहे. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्पेल्क्सवर हा सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ६ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या आहेत. यासह भारताला विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य मिळाले. १७.२ षटकातच ३ विकेट्सच्या नुकसानावर भारतीय संघाने हे आव्हान पूर्ण केले आणि ७ विकेट्सने सामना जिंकला. यासह त्यांनी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडच्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने शानदार खेळी केल्या. या सलामीवीरांमध्ये पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागिदारी झाली. राहुलने ४९ चेंडूंमध्ये सर्वाधिक ६५ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ६ चौकार मारले. तसेच रोहितनेही कर्णधार खेळी करत ५५ धावा जोडल्या.

रोहित आणि राहुलच्या विकेट गेल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि रिषभ पंतने संघाच्या विजयाची जबाबदारी घेतली. प्रत्येकी १२ धावांची नाबाद खेळी करत त्यांनी १८ षटकांमध्येच संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या पथ्यावर पडला. भारतीय गोलंदाजाच्या सांघिक कामगिरीमुळे न्यूझीलंडचा एकही फलंदाज ३५ पेक्षा जास्त धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिचेल या सलामीवीरांनी प्रत्येकी ३१ धावांचे योगदान दिले. परिणामी न्यूझीलंडला २० षटकअखेर १५३ धावा करता आल्या.

भारताकडून पदार्पणवीर हर्षल पटेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. हर्षलव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, दिपल चाहर, अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट चटकावली.

हर्षल पटेलचे पदार्पण

या सामन्यापूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार ६.३० वाजता नाणेफेक झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यातही नाणेफेक जिंकली असून त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल.

या सामन्यात भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. त्याला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. सिराजला पहिल्या टी२० सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंड संघात ३ बदल करण्यात आले आहेत. लॉकी फर्ग्युसन, रचिन रवींद्र आणि टॉड ऍस्टल यांना बाकावर बसवत ऍडम मिल्ने, जिम्मी नीशम आणि ईश सोधी यांना संधी दिली गेली आहे.

भारतीय संघ (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल

न्यूझीलंड संघ (प्लेइंग इलेव्हन): मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), जि्म्मी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी (कर्णधार), ऍडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---