भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील पहिला सामना (First T20I) झाला. लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल ६ बदल पाहायला मिळाले. तसेच भारतीय संघाला अजून एक धक्काही बसला आहे. भारताचा युवा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या सामन्यात अनुपलब्ध होता. दुखापतीमुळे (Ruturaj Gaikwad Injured) तो या सामन्यात खेळू शकला नाही.
भारताच्या टी२० संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मागील वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेला मुकला होता. त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतूनही बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्याजागी ऋतुराजला भारताच्या टी२० संघात जागा देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्णवेळ बाकावर बसून राहिलेल्या ऋतुराजला कमीत कमी श्रीलंकेविरुद्ध तरी खेळण्याची संधी मिळेल, अशी क्रिकेटप्रेमींना वाटत होते.
परंतु लखनऊ येथील पहिल्या टी२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर करताना कर्णधार रोहित शर्मा याने ऋतुराज दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) ट्वीट करत यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
“ऋतुराज गायकवाडला त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात वेदना जाणवत आहेत. यामुळे तो फलंदाजी करण्यास अक्षम आहे. म्हणून तो पहिल्या टी२० सामन्यात खेळू शकणार नाही. भारतीय संघाची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे,” असे बीसीसीआयने म्हटले आहे.
UPDATE – Ruturaj Gaikwad complained of pain in his right wrist, which is affecting his batting. He was unavailable for selection for the first T20I. The BCCI Medical Team is examining him.@Paytm #INDvSL
— BCCI (@BCCI) February 24, 2022
एकीकडे ऋतुराज दुखापतीमुळे पहिल्या टी२० सामन्यात खेळू शकला नाही. दुसरीकडे या सामन्यातून संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल या ५ खेळाडूंचे पुनरागमन झाले. त्याचबरोबर दीपक हुडाने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करणारा भारताचा ९७ वा खेळाडू ठरला आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL: श्रीलंकेने पहिल्या टी२०त जिंकला टॉस, भारताच्या प्लेईंग ११ मध्ये तब्बल ६ बदल
शेन वॉर्नसाठी सचिन नाहीये ‘गॉड ऑफ क्रिकेट’, पाहा कोणाचं घेतलंय नाव