4 आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शनिवारी किंवा रविवारी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. या संघातून भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला वगळण्याची दाट शक्यता आहे.
यासाठी त्याच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतील खराब कामगिरीचा फटका त्याला बसला असल्याची शक्यता आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सुत्रांनी माहिती दिली आहे की निवड समिती विंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शिखरला वगळणार आहे.
तसेच कर्नाटकचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालला कसोटी संघात पहिल्यांदाच संधी दिली जाणार आहे.
याबरोबरच मुंबईकर पृथ्वी शॉलाही विंडिज विरुद्ध संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या दोघांचीही विंडिजच्या सराव सामन्यासाठी अध्यक्षीय एकादश संघात निवड झाली आहे.
मात्र शिखरला मागील काही महिन्यांपासून कसोटीत सातत्याने अपयश आले होते. त्याला इंग्लड विरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते. पण त्यानंतर तो उर्वरित तीनही कसोटी सामन्यांमध्ये खेळला आहे.
या आॅगस्ट-सप्टेंबर दरम्यान झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शिखरने खेळलेल्या चार कसोटीत त्याने 26,13,35,44,23,17,3,1 अशा मिळून 20.25 च्या सरासरीने 162 धावा केल्या होत्या.
त्याच्या या अशा कामगिरीमुळे निवड समितीने त्याला विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.
विंडिज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची संघनिवड करण्यासाठी बीसीसीआय निवड समितीची बुधवारी बैठक पार पडली आहे.
पण निवड समिती हा संघ घोषित करण्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या मनगटाच्या दुखापतीबद्दल अहवाल येण्याची वाट पाहत आहे.
तसेच या मालिकेसाठी भारताचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहलाही विश्रांती दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
–विंडिज विरुद्ध कोहलीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; काय आहे कारण जाणून घ्या
–भारत-बांगलादेश अंतिम सामन्याची तिकिटे नाराज पाकिस्तानी चाहत्यांनी विकली
–कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो