भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लवकरच कसोटी आणि वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून वेळापत्रकातही एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मालिकेत एक कसोटी आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, पहिल्या वनडे सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
भारत-अफगाणिस्तान मालिकेला ६ जूनपासून सुरुवात होणार आहे. पहिला आणि एकमेव कसोटी सामना न्यू चंदीगड येथे खेळवला जाईल. हा सामना १० जूनपर्यंत चालू शकतो. कसोटी सामन्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
यानंतर वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला वनडे सामना आधी १४ जून रोजी होणार होता, मात्र आता हा सामना १३ जूनला खेळवला जाणार आहे. हा सामना धर्मशाला येथेच होईल, फक्त तारखेत बदल करण्यात आला आहे.
दुसरा वनडे सामना १७ जूनला लखनऊ येथे खेळवला जाईल, तर तिसरा आणि अखेरचा वनडे सामना २० जूनला चेन्नई येथे होणार आहे. या दोन्ही सामन्यांच्या तारखा पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आल्या आहेत.
ही मालिका २०२७ वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. संघ व्यवस्थापन खेळाडूंची फिटनेस, फॉर्म आणि युवा खेळाडूंची कामगिरी यावर विशेष लक्ष ठेवणार आहे.
भारतीय कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयसवाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, रिषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर बराड, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
भारतीय वनडे संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.






