मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे शनिवार (२६ डिसेंबरपासून) सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १ बाद ३६ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाला १९५ धावांवर रोखल्यानंतर भारताकडून पहिल्या डावात शुबमन गिल आणि मयंक अगरवाल हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र पहिल्याच षटकात मयंक अगरवाल शुन्यावर मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र त्यानंतर पहिलाच कसोटी सामना खेळणारा गिल आणि पुजाराने भारताचा डाव सांभाळत एकही विकेट दिवसाखेरपर्यंत पडू दिली नाही.
यावेळी गिलने काही आक्रमक फटकेही खेळले. तर पुजाराने चौकाराने त्याच्या धावांचे खाते उघडले. दिवसाखेर गिल २८ धावांवर तर पुजारा ७ धावांवर नाबाद आहेत. गिलने दिवसाखेरपर्यंत ५ चौकार मारले होते.
ऑस्ट्रेलिया १९५ धावांवर सर्वबाद
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पहिला डाव केवळ १९५ धावांवर आटोपला आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७२.३ षटकात सर्वबाद १९५ धावा केल्या. त्यांच्याकडून मार्नस लॅब्यूशानेने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने ३ आणि पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने २ विकेट्स मिळवल्या. जडेजाला १ विकेट मिळाली.
सिराजची कमाल
दुसऱ्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाने ५२ षटकात ५ बाद १३६ धावा केल्यानंतर तिसऱ्या सत्रातही त्यांची अडखळत सुरुवात झाली. ५३ ते ५८ षटकात ऑस्ट्रेलियाला केवळ ८ धावाच करता आल्या. दरम्यान अश्विनने १ आणि सिराजने २ षटके निर्धाव टाकली. तसेच ५५ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार धावबाद होतात होता वाचला. अश्विनने ५९ व्या षटकात एकच धाव दिली. मात्र ६० व्या षटकात पेन आणि ग्रीनने चौकारासह सिराजच्या गोलंदाजीवर ७ धावा वसूल केल्या.
अश्विनने ६१ व्या षटकात एकच धाव दिली. तर ६२ व्या षटकात सिराजने शानदार गोलंदाजी करत ग्रीनला पायचीत बाद केले. ग्रीन १२ धावा करुन बाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात अश्विनने पेनला १३ धावांवर बाद केले. पेनचा झेल हनुमा विहारीने घेतला. दोन सलग षटकात २ विकेट पडल्याने मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांची जोडी मैदानावर उतरली.
या दोघांना सामन्याच्या ६४ व्या षटकात सिराजने एकच धाव दिली. ६५ वे षटक अश्विनने निर्धाव टाकले. बुमराहने टाकलेल्या ६६ व्या षटकात मात्र चौकार ठोकला. तसेच कमिन्ससह ८ धावा वसूल केल्या. पण पुढचेच षटक अश्विनने निर्धाव टाकले. ६८ व्या षटकात आक्रमक पवित्रा घेतलेल्या स्टार्कला बुमराहने माघारी धाडले. स्टार्कने ७ धावा केल्या. विशेष म्हणजे स्टार्कचा झेल सिराजने घेतला. स्टार्क बाद झाल्यानंतर लायन फलंदाजीसाठी आला.
अश्विनने टाकलेल्या ६९ व्या षटकात कमिन्सने चौकार ठोकला. तसेच लायनने एक धाव काढली. ७० व्या षटकात लायनने बुमराहविरुद्ध चौकारासह एकूण ६ धावा काढल्या. ७१ व्या षटकात जडेजाने केवळ २ धावा दिल्या.
पण ७२ व्या षटकात लायनने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार ठोकला होता. पण पाचव्या चेंडूवर बुमराहने त्याला पायचीत केले. त्याच्यापाठोपाठ पुढच्याच षटकात पॅट कमिन्सला जडेजाने बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. कमिन्सचा झेल सिराजने पकडला. लायनने २० आणि कमिन्सने ९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आला.
दुसऱ्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाने ५२ षटकात ५ बाद १३६ धावा केल्या
ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ बाद १२५ धावा केल्या होत्या. ४४ व्या षटकात बुमराहने केवळ २ धावा दिल्या. तर ४५ व्या षटकात उमेश यादवने एकही धाव दिली नाही. त्यामुळे हे षटक निर्धाव गेले. ४६ व्या षटकात बुमराहविरुद्ध लॅब्यूशेन आणि ग्रीनने केवळ ३ धावाच काढल्या. ४७ व्या अश्विन पुन्हा गोलंदाजीला आला. त्याने केवळ १ धाव दिली. सिराजने ४८ वे षटक निर्धाव टाकले. ४९ व्या षटकात अश्विन विरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांना केवळ ३ धावाच करण्यात यश आहे.
सामन्याच्या ५० व्या षटकात मात्र ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लॅब्यूशेन सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा स्केवअर लेगला शुबमन गिलने शानदार झेल घेतला. या षटकात एकही धाव निघाली नाही.
लॅब्यूशाने ४८ धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन मैदानावर आला. ५१ व्या षटकात अश्विनने १ धावच दिली. तर ५२ व्या षटकात ग्रीनने केवळ १ धाव काढली.
या षटकानंतर दुसरे सत्र संपले. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाने ५२ षटकात ५ बाद १३६ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात
पहिल्या सत्रात ६५ धावांवर ३ विकेट्स गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशेन आणि ट्रेविस हेड संयमी फलंदाजी करताना दिसले. दुसऱ्या सत्रातील पहिल्याच षटकात रहाणेने पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू सोपवला. त्यानेही पहिल्याच षटकात चांगली गोलंदाजी करताना केवळ २ धावा दिल्या.
आर अश्विनने २९ वे षटक निर्धाव टाकले. ३० व्या षटकात सिराजने पुन्हा केवळ २ धावाच दिल्या. ३१ व्या षटकात लॅब्यूशेन आणि हेड यांना अश्विनविरुद्ध केवळ ३ धावाच काढता आल्या. त्यामुळे दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला हेड आणि लॅब्यूशेनने सावध खेळ करण्यावरच भर दिल्याचे दिसून आले.
३२ व्या षटकातही २ धावाच निघाल्या. ३३ व्या षटकात मात्र हेडने चौकारासह अश्विनविरुद्ध ५ धावा काढल्या. सिराजने टाकलेले ३४ वे षटक थोडे महागडे ठरले. या षटकात लॅब्यूशेन आणि हेडने चौकारासह ९ धावा वसूल केल्या.
उमेश यादव ३५ व्या षटकात पुन्हा गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकात २ धावा दिल्या. ३६ व्या षटकाचा दुसरा चेंडू लॅब्यूशेनच्या हेल्मेटवर आदळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची मेडिकल टीममधील सदस्य लगेचच मैदानावर आले. पण लॅब्यूशेनने फलंदाजी करणे कायम ठेवले.
उमेशने टाकलेल्या ३७ व्या षटकात चौकारासह ५ धावा काढल्या. ३८ व्या षटकात हेडने सिराजविरुद्ध चौकारासह एकूण ७ धावा वसूल केल्या. ३९ व्या षटकात उमेशने केवळ ३ धावा दिल्या. तर ४० व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी परत आला. मात्र त्याच्या या षटकात हेडने सलग २ चौकार लगावले. यासह या षटकात १० धावा निघाल्या.
उमेश यावरच्या ४१ व्या षटकात लॅब्यूशेनने चौकार वसूल केला. या षटकात ५ धावा निघाल्या. लॅब्यूशेन आणि हेड यांची जोडी जमली असतानाच ४२ व्या षटकात बुमराहने पाचव्या षटकात हेडला बाद केले. हेडचा झेल रहाणेने पकडला. त्यामुळे हेडला ३८ धावांवर बाद झाला. हेड आणि लॅब्यूशेन यांच्यात चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी झाली.
हेड बाद झाल्यानंतर युवा कॅमेरॉन ग्रीन फलंदाजीसाठी आला आहे. ४३ व्या षटकात लॅब्यूशेन आणि ग्रीनला १ धावच काढता आली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४३ षटकात ४ बाद १२५ धावा केल्या असून लॅब्यूशेन ४४ धावांवर आणि ग्रीन शुन्यावर नाबाद खेळत आहेत.
पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या २७ षटकात ३ बाद ६५ धावा
पहिल्या १५ षटकातच ३ विकेट्स गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशेन आणि ट्रेविस हेडने ऑस्ट्रेलियाला सावरण्याचा प्रयत्न केला.
१६ ते १९ षटकापर्यंत आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत केवळ ३ धावाच दिल्या. २० व्या षटकात अजिंक्य रहाणेने रविंद्र जडेजाकडे गोलंदाजी सोपवली. त्यानेही या षटकात केवळ २ धावा दिल्या. २१ व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर हेड आणि लॅब्यूशेनने ५ धावा काढल्या. २२ वे षटकत जडेजाने निर्धाव टाकले. २३ ते २५ या तीन षटकात जडेजा आणि अश्विनच्या जोडीने केवळ ६ धावा दिल्या.
२६ व्या षटकात मात्र जडेजाच्या गोलंदाजीवर लॅब्यूशेनने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोरला. तसेच पुढच्या तीन चेंडूत ३ धावा काढल्या. तर हेडने पाचव्या चेंडूवर ३ धावा पळून काढल्या. २७ व्या षटकात लॅब्यूशेनला अश्विनच्या गोलंदाजीवर पंचांनी पायचीत दिले होते, मात्र त्याने रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूमध्ये तो नाबाद असल्याचे दिसले. त्यामुळे पंचांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
या षटकासह पहिले सत्र संपले. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने २७ षटकात ३ बाद ६५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्यूशेन २६ धावांवर तर हेड ४ धावांवर नाबाद खेळत आहेत.
भारताकडून अश्विनने २ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली.
अश्विनने दिले २ मोठे धक्के
पहिल्या ५ षटकांच्या आतच पहिली विकेट गमावल्यानंतर पुढील ५ षटकात ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मॅथ्यू वेड आणि मार्नस लॅब्यूशेनने संयमी खेळ केला.
६ व्या षटकात वेडने चौकार ठोकला. या षटकात ७ धावा निघाल्या. ७ व्या षटकात बुमराहने ३ धावाच दिल्या. तर ८ वे षटक उमेश यादवने निर्धाव टाकले. याचाच फायदा घेत बुमराने ९ व्या षटकात शानदार गोलंदाजी करताने केवळ २ धावा दिल्या. या दरम्यान वेड आणि लॅब्यूशेन सावध फलंदाजी करताना दिसले.
१० व्या षटकातही उमेशने चांगले गोलंदाजी प्रदर्शन करताना ३ धावा दिल्या. ११ व्या षटकात प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने आर अश्विनकडे चेंडू सोपवला. अश्विननेही हा विश्वास सार्थ ठरताना १ च धाव दिली. पुढील १२ व्या षटकात पहिल्यात चेंडूवर वेडने ३ धावा पळून काढल्या. पण त्यानंतर लॅब्यूशेन या षटकात केवळ १ धाव करु शकला.
१३ व्या षटकात भारताला दुसरे यश मिळवून दिले. या षटकात वेडने चौथ्या चेंडूवर चौकार ठोकला होता. पण पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याला मीड-विकेटला रविंद्र जडेजाने अफलातून झेल घेतला. त्यामुळे वेडला ३० धावांवर विकेट गमवावी लागली. त्यामुळे स्टिव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
१४ वे षटक बुमराहने निर्धाव टाकले. तर १५ व्या षटकात आर अश्विनने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ अश्विनच्या गोलंदाजीवर शुन्य धावेवर बाद झाला. त्याचा चेतेश्वर पुजाराने झेल घेतला.
ऑस्ट्रेलियाने १५ षटकात ३ बाद धावा केल्या.
बुमराने घेतली पहिली विकेट –
पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने टाकलेले पहिले षटक निर्धाव ठरले. तर उमेशच्या दुसऱ्या डावात मॅथ्यू वेडने ३ धावा पळुन काढल्या. बुमराहने टाकलेल्या तिसऱ्या षटकात १ धाव निघाली. चौथ्या षटकात उमेशने ६ धावा दिल्या.
तर पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराहने जो बर्न्सला बाद केले. बर्न्स शुन्यावर बाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक पंतने पकडला. तो बाद झाल्यानंतर मार्नस लॅब्यूशेन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. या षटकात धावा निघाल्या.
ऑस्ट्रेलियाने ५ षटकात १ बाद १० धावा केल्या.
गिल, सिराजचे पदार्पण
या कसोटी सामन्यातून भारताकडून मोहम्मद सिराज आणि शुबमन गिलने पदार्पण केले आहे. शुबमन गिलला प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्याकडून कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली. तो कसोटीत पदार्पण करणारा भारताचा २९७ वा खेळाडू ठरला. तर सिराजला अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने कसोटी पदार्पणाची कॅप दिली. तो २९८ भारतीय कसोटीपटू ठरला.
तसेच या सामन्यात रविंद्र जडेजा आणि रिषभ पंतने भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात पुनरागमन झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
असे आहेत संघ –
भारतीय संघ –
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शुभमन गिल, रिषभ पंत, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया संघ –
जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लॅब्यूशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक)), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवुड.