---Advertisement---

ब्रिस्बेन टेस्ट : भारताकडून यजमान ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत! सामन्यासह २-१ च्या फरकाने ऐतिहासिक मालिका विजय

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 1:08 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे.या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

मंगळवारी(१९ जानेवारी) या सामन्याचा शेवटचा दिवस होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ९७ षटकात ७ विकेट्स गमावत ३२९ धावा केल्या आणि हा सामना खिशात घातला.

या डावात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.

शेवटच्या १५ षटकात ६९ धावांची गरज 

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून पुजारापाठोपाठ रिषभ पंतनेही अर्धशतक केले आहे. आता भारताला या दिवसाच्या शेवटच्या १५ षटकात ६९ धावांची गरज आहे. सध्या पंत आणि मयंक अगरवाल फलंदाजी करत आहेत.

पंतने १०० चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने मयंकच्या साथीने भारताचा डाव सावरला आहे. भारताने ८५ षटकात ४ बाद २५९ धावा केल्या आहेत. अद्याप भारताला ६९ धावांची गरज आहे. सध्या पंत ५१ धावांवर आणि मयंक ९ धावावंर खेळत आहे.

पुजारा अर्धशतक करुन बाद – 

तिसऱ्या सत्रात पुजाराने अर्धशतक केल्यानंतरही सावध खेळ केला होता. मात्र ८० व्या षटकानंतर ऑस्ट्रेलियाने नवीन चेंडू घेतल्यानंतर लगेचच पॅट कमिन्सने पुजाराला पायचीत केले. पुजाराने डीआरएस रिव्ह्यूचा वापर केला. मात्र, अंपायर्स कॉल असा निकाल आल्यानंतर आणि पंचांनी त्याला बाद दिलेले असल्याने त्याला माघारी परतावे लागले. पुजाराने २११ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार मारले.

तो बाद झाल्यानंतर मयंक अगरवाल फलंदाजीला आला असून पंत ३४ धावांवर नाबाद खेळत आहे. भारताने ८१ षटकात ४ बाद २३२ धावा केल्या आहेत. अद्याप भारताला ९६ धावांची गरज आहे.

पुजाराचे अर्धशतक – 

दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ३ विकेट्स गमावल्यानंतर भारताकडून चेेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला सावध खेळ केला. पुजाराने सुरुवातीपासूनच एक बाजू सांभाळली असल्याने भारताचे या सामन्यातील आव्हान कायम राहण्यात मदत झाली आहे. त्याने तिसऱ्या सत्रात १९६ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात धिम्यागतीचे अर्धशतक ठरले आहे.

भारताने दुसऱ्या डावात ७५ षटकात ३ बाद २१८ धावा केल्या आहेत. त्यांना अजून ११० धावांची गरज आहे. सध्या चेतेश्वर पुजारा ५२ धावांवर तर रिषभ पंत ३२ धावांवर नाबाद खेळत आहे.

दुसऱ्या सत्राखेर भारताच्या ३ बाद १८३ धावा

दुसऱ्या सत्राखेर भारताने ६३ षटकात ३ बाद १८३ धावा केल्या आहेत. अद्याप भारताला १४५ धावांची गरज आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर रिषभ पंत पुजाराला चांगली साथ देताना दिसला. दुसऱ्या सत्राचा खेळ संपला त्यावेळी पंत २३ चेंडूत १० धावांवर नाबाद खेळत आहे. तर पुजाराने अर्धशतकाकडे वाटचाल केली आहे. त्याने १६८ चेंडूत ४३ धावांची नाबाद खेळी केली आहे. तो अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे.

शुभमन पाठोपाठ अजिंक्य रहाणे बाद 

शुभमन ९१ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार रहाणे चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी आला होता. या दोघांनी त्यांच्या भागीदारीची सुरुवात शानदार केली. यावेळी एका बाजूने चेतेश्वर पुजाराने डाव सांभाळला असताना रहाणे आक्रमक अंदाजात खेळत होता. त्यांनी ५४ व्या षटकापर्यंत भारताला १५० धावांचा टप्पा पार करुन दिला होता. शुभमन-पुजाराच्या शतकी भागीदारीनंतर आता रहाणे आणि पुजाराची जोडी जमणार असे वाटत असतानाच पॅट कमिन्सने ५७ व्या षटकात रहाणेला बाद केले. या षटकातील ५ व्या चेंडूवर रहाणे फटका मारण्याच्या नादात यष्टीरक्षक टीम पेनकडे झेल देऊन बसला. रहाणेने २२ चेंडूत २४ धावा केल्या. या छोटेखानी खेळीत त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला.

तो बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजीला आला आहे. पंतने पहिली धाव काढताच त्याने कसोटी कारकिर्दीत १००० धावाही पूर्ण केल्या आहेत.

भारताने दुसऱ्या डावात ६० षटकात ३ बाद १७५ बाद धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजारा ४३ धावांवर आणि रिषभ पंत ७ धावांवर नाबाद खेळत आहे. भारताला अजून धावांची गरज आहे.

गिलचे शतक थोडक्यात हुकले 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याचे शतक केवळ ९ धावांनी हुकले.

शुभमनने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा आंगिकारत शानदार शॉट खेळले होते. त्याने ४६ व्या षटकात मिशेल स्टार्क विरुद्ध दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे ६, ४, ४ अशा धावा वसूल केल्या. तो याच आक्रमणासह शतकी खेळी करेल असे वाटत असतानाच ४८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नॅथन लायनविरुद्ध खेळताना झेलबाद झाला. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे गेला. स्मिथनेही चूक न करता झेल घेतला. त्यामुळे शुभमन १४६ चेंडूत ९१ धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने चेतेश्वर पुजारासह ११४ धावांची भागीदारी रचली.

भारताने ४८ षटकात २ बाद १३२ धावा केल्या असून अद्याप भारताला १९६ धावांची गरज आहे. सध्या चेतेश्वर पुजारा २६ धावावंर खेळत असून त्याला साथ देण्यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानावर आला आहे.

पहिल्या सत्रात रोहितची विकेट –

पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने १ बाद ८३ धावा केल्या आहेत. भारताने पाचव्या दिवसाची सुरुवात बिनबाद ४ धावांपासून केली. पण भारताला पहिला धक्का लवकर बसला. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ९ व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर पॅट कमिन्सच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक रोहित शर्माने घेतला. रोहित ७ धावा करुन बाद झाला.

रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. त्याने सलामीवीर शुभमन गिलला भक्कम साथ दिली. शुभमनने काही शानदार शॉट खेळताना २९ व्या षटकात ९० चेंडूत त्याचे या मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर आणि शुभमन यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली आहे. गिलने ३८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिशेल स्टार्कच्या विरुद्ध थर्ड मॅनवरुन एक शानदार षटकार मारला.

पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताने ३८ षटकात १ बाद ८३ धावा केल्या आहेत. शुभमन ६४ धावांवर आणि चेतेश्वर ८ धावांवर नाबाद आहे. अद्याप भारताला २४५ धावांची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---