ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शुक्रवारी (११ डिसेंबर) ३ दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघावर ८६ धावांची आघाडी मिळवली. यात भारतीय संघाच्या एका खेळाडूचा मोलाचा वाटा राहिला. हा खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. बुमराहने सुरुवातीला धडाकेबाज फलंदाजी तर केलीच, तसेच गोलंदाजीतही आपला जलवा दाखवला.
या सराव सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडली होती. मात्र ५० षटकांच्या आतच ऑस्ट्र्रेलिया ‘अ’च्या गोलंदाजांनी भारतीय संघाला सर्वबाद केले. त्यामुळे भारतीय संघ केवळ १९४ धावा करु शकला. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ फक्त १०८ धावाच करु शकला.
भारतीय संघाचा डाव
भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना बुमराहने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १०व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ५७ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. यात त्याच्या ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने ४३ धावा आणि पृथ्वी शॉ याने ४० धावा केल्या. तसेच मोहम्मद सिराजनेही २२ धावांचे योगदान दिले. इतर खेळाडूंना २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.
ऑस्ट्रेलिया अ संघाकडून गोलंदाजी करताना सिन अबॉट आणि जॅक वाइल्डरमथ यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर हॅरी कॉन्वे, विल सदरलँड, कॅमरॉन ग्रीन, मिचेल स्वेप्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया संघाचा डाव
भारतीय संघाच्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया अ संघाचे फलंदाज विशेष कामगिरी करु शकले नाहीत. संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरी याने सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्कस हॅरीसने २६ धावा केल्या. तर निक मॅडीसनने १९ धावा आणि जॅक वाइल्डरमथने १२ धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाजांना २ आकडी धावाही करता आल्या नाहीत.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनी सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर बुमराहनेही २ विकेट्स पटकावल्या. तर, मोहम्मद सिराजनेही एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
इरफान पठाणच्या नावे अनोखा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय खेळाडू
ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंतेत भर; जसप्रीत बुमराहच्या पावरफुल शॉटने ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त
“कसोटी मालिकेत स्लेजिंग तर होणारच!” ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे विधान