टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंगळवारी (20 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन पहिल्यांदाच सलामीवीराच्या रूपात खेळला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंंगळवारी मोहालीमध्ये सुरू झाली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 विकेट्सने नावावर करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले ते म्हणजे सलामीवीराच्या रूपात खेळणाऱ्या कॅमरून ग्रीन याने. सामना संपल्यानंतर ग्रीनने सांगितले की, भारतीय फलंदाजांची खेळी पाहिल्यामुळे त्याला स्वतःच्या संघासाठी महत्वाचे योगदान देता आले.
फलंदाजी आष्टपैलू कॅमरून ग्रीन (Cameron Green) या सामन्यात 30 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावांची वादळी खेळी केली. या धावा त्याने 203.33 च्या स्ट्राईक रेटने केल्या आणि संघाला चांगली सुरुवात देखील दिली. भारताने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि 6 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावांचे आव्हान उभे केले होते. भारतीय फलंदाजांचे प्रदर्शन पाहायला मिळाल्यामुळे कॅमरून ग्रीनला देखील फायदा झाल्याचे त्याने स्वतः सांगितले.
मालिकेत पहिला विजय मिळवून आघाडी घेतल्यानंतर ग्रीन माध्यमांशी बोलत होता. तो म्हणाला, “आम्हाला भारतीय संघाच्या फलंदाजांना पाहण्याची संधी मिळाली आणि हार्दिक पंड्याचे प्रदर्शन पाहता, तो सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक असला पाहिजे. त्याला खेळताना पाहून आनंद झाला. त्याला पाहूनच आम्हाला समजले की, लक्ष्याचा पाठलाग करताना कशी फलंदाजी करायची आहे.”
ग्रीनला ऑस्ट्रेलियन संघासाठी पहिल्यांदाच सलामीसाठी आला होता. अशात त्याच्यावर दबाव होता, पण खेळपट्टीवर त्याच्या सोबत असलेल्या कर्णधार एरॉन फिंच () याची त्याला चांगली साथ मिळाली. “मला पहिल्यांदाच सलामीसाठी पाठवले गेले होते, त्यामुळे थोडे दडपण होते. परंतु एका अनुभवी खेळाडूच्या रूपात फिंचसारखा एखादा व्यक्ती सोबत असल्यामुळे चांगले झाले. त्याने मला शांत ठेवले,” असेही ग्रीनने पुढे बोलताना सांगितले. फिंचच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने 13 चेंडूत 22 धावा करून विकेट गमावली होती.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 200 धावांचा टप्पा पार केला असला, तरी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी देखील तितक्याच ताकदीने लक्ष्याचा पाठलाग केला. शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सने चौकार मारून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी भारतासाठी हार्दिक पंड्याने अवघ्या 30 चेंडूत 71 धावांची वादळी खेळी केली. गोलंदाजी विभागात भारतासाठी अक्षर पटेल सोडला, तर इतर सर्वांची धुलाई झाली. अक्षरने 4 षटकांमध्ये 17 धावा दिल्या आणि सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. उमेश यादव मोठ्या काळानंतर भारतीय संघासाठी खेळला. त्याने 2 विकेट्स घेतल्या, पण दोन षटकांमध्ये तब्बल 27 धावाही खर्च केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच टी20 चे किंग! 209 धावांचा पाठलाग करत चारली टीम इंडियाला धूळ; ग्रीन-वेड विजयाचे शिल्पकार
रोहित-विराटकडून पुन्हा निराशा! संघाला संकटात टाकून परतले तंबूत