जागतिक क्रिकेटमध्ये युनिवर्सल बॉस म्हणून ओळख असलेला ख्रिस गेल आज आपला ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सध्या इंडियन प्रीमियर लीगचा भाग असल्याने संयुक्त अरब अमिराती देशात आहे. त्याला काल किंग्ज ११ पंजाब संघाकडून खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही.
ख्रिस गेल हा क्रिकेट जगतातील असा एकमेव फलंदाज आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत त्रिशतक, वनडेत द्विशतक व टी२०त शतक केले आहे. जगातील कोणत्याही अन्य क्रिकेटरला असा कारनामा करता आलेला नाही.
गेलने कसोटी क्रिकेटमध्ये ३३३ धावांची धमाकेदार खेळी आहे. तर वनडेत २१५ धावा करत द्विशतकी खेळी त्याने केली आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ११७ धावांची खेळी केली आहे.
जगातील अन्य कोणत्याही फलंदाजाला हा कारनामा करता आलेला नाही. रोहित शर्माने वनडेत द्विशतक व टी२०मध्ये शतक केले आहे परंतू त्याला कसोटीत त्रिशतक करता आले नाही. मार्टिन गप्टिलची अवस्थाही रोहितसारखीच आहे. विरेंद्र सेहवागने कसोटीत त्रिशतक व वनडेत द्विशतक केले आहे परंतू टी२०मध्ये ६८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
त्यामुळे सध्यातरी एक खास व हटके विक्रम हा ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. ख्रिस गेल हा सध्या क्रिकेट खेळत असलेल्या अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण १९९९मध्ये झाले आहे.
वाचा- एकेवेळी अतिशय मोठी शारिरीक समस्या असलेला गेल पुढे झाला युनिवर्सल बॉस