भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दोन्ही देशांमधील ही लोकप्रिय मालिका शुक्रवार (22 नोव्हेंबर) पासून सुरू होईल. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी रोहित शर्माच्या जागी भारताचा कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहनं पत्रकार परिषदेत मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यादरम्यान त्यानं भारताच्या प्लेइंग 11 बाबत एक मोठं अपडेट दिलं आहे.
रोहित शर्मा पत्नीच्या बाळंतपणामुळे अद्याप ऑस्ट्रेलियाला पोहोचलेला नाही. शुबमन गिल आणि मोहम्मद शमीच्या दुखापतींमुळे संघ आधीच अडचणीत आहे. अशा परिस्थितीत भारताची प्लेइंग 11 कशी असेल हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. हे स्पष्ट आहे की बुमराह कर्णधार असेल आणि केएल राहुल यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी सांभाळेल. देवदत्त पडिक्कलला मधल्या फळीत स्थान मिळू शकतं. सर्फराज खानचं खेळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. तसेच एकमेव फिरकीपटू म्हणून रविचंद्रन अश्विन खेळू शकतो. याशिवाय दोन नवीन खेळाडूही पदार्पण करू शकतात. बुमराहनं याबाबत काय म्हटलं, हे जाणून घ्या.
वास्तविक, जसप्रीत बुमराहनं सामन्याच्या एक दिवस आधी मीडियासमोर सांगितलं की, “आम्ही आमची प्लेइंग 11 फायनल केली आहे आणि शुक्रवारी सकाळी मॅचपूर्वी तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.” दुखापतींमुळे भारतीय संघ अडचणीत असला तरी कर्णधार खूपच आत्मविश्वासात दिसला. गेल्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवावर निराशा व्यक्त करताना बुमराह म्हणाला की, आता त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागेल. आम्ही त्या पराभवातून शिकून इथे आलो आहोत, असं तो म्हणाला.
पर्थ कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11 – यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, हर्षित राणा
हेही वाचा –
‘माझे मन म्हणतं भारत जिंकेल, पण…’, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी
‘मला जबाबदाऱ्या आणि आव्हाने…’, जसप्रीत बुमराहचे पर्थ कसोटीपूर्वी कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य
IND vs AUS: टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली, कर्णधार जसप्रीत बुमराहने केला मोठा खुलासा