कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून (४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील मनुका ओव्हल स्टेडियमवर होत असलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १६१ धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकात ७ बाद १५० धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ११ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाने १२ षटकात ८५ धावांवर ३ विकेट्स गमावले होते. पण त्यानंतर शॉर्ट आणि मोझेस हेन्रीक्सने संघाचा डाव सांभाळला.
१३ व्या षटकात हेन्रीक्सने पहिल्याच षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर षटकार ठोकला. पण नंतर शॉर्ट आणि हेन्रीक्सने एकेरी धावाच काढल्या. १४ व्या षटकात या दोघांनी १ चौकारासह ९ धावा काढल्या. तर १५ व्या षटकात पहिल्या ५ चेंडूत ९ धावा काढल्यानंतर शॉर्टने टी नटराजनच्या गोलंदाजीवर दिशेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हार्दिकने त्याचा झेल घेतला. शॉर्टने ३८ चेंडूत ३४ धावा केल्या.
१६ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी करताना केवळ ३ धावाच हेन्रीक्स आणि मॅथ्यू वेड यांना करु दिल्या.
१७ व्या षटकात चहल पुन्हा गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्या पाच चेंडूवर ६ धावाच दिल्या आणि शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू वेडला ७ धावांवर विराट कोहली करवी झेलबाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ चांगलाच अडचणीत सापडला.
दीपक चाहरने टाकलेल्या १८ व्या षटकात नाट्यपूर्ण घडामोडी पाहायला मिळाल्या. या षटकात चौथ्या चेंडूवर हेन्रीक्स पायचीत बाद झाला. त्याच्या विकेटसाठी कोणीही अपील केले नव्हते फक्त राहुलने अपील केले होते. यावर पंचांनी त्याला बाद दिले. त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतला. पण रिव्ह्यूमध्ये तो बाद असल्याचे दिसल्याने त्याला ३० धावांवर विकेट गमवायला लागली.
यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टी नटराजनने मिशेल स्टार्कला त्रिफळाचीत केले. स्टार्क १ धावेवर बाद झाला. या षटकात ८ धावा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना करता आल्या.
शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला २७ धावांची गरज होती. पण ऑस्ट्रेलियाला १५ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून सीन ऍबॉट १२ आणि मिशेल स्वेप्सनही १२ धावांवर नाबाद राहिला.
भारताकडून गोलंदाजीत टी नटराजन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने १ विकेट घेतली.
भारताची चांगली गोलंदाजी
या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंच आणि डॉर्सी शॉर्ट हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी आले. या दोघांनीही चांगली सुरुवात केली. दीपक चाहरने टाकलेल्या पहिल्याच षटकात फिंचने २ आणि शॉर्टने १ चौकार मारला.
दुसऱ्या षटकात या दोघांनीही एकेरी दुहेरी धावावंर भर दिला. तर तिसऱ्या षटकात शॉर्टने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर २ चौकार ठोकले. त्यामुळे पहिल्या ३ षटकातच २६ धावा केल्या.
वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फिंचेने चौकार ठोकला. पण त्यानंतर सुंदरने त्याला मोठे फटके खेळू दिले नाही. पाचव्या षटकात फिंचने आक्रमक खेळताना शमीच्या चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. यावेळी शॉर्ट एकेरी-दुहेरी धावांवर भर देताना दिसला.
सहाव्या षटकात टी नटराजनने गोलंदाजी केली. त्याने टाकलेल्या या षटकात फिंचने एक चौकार वसूल केला. बाकी चेंडूंवर शॉर्ट आणि फिंचने एकेरी धावा काढल्या.
सातव्या षटकात फिंचचा झेल पंड्याकडून सुटला. या षटकात चाहरने मोठे फटके ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना मारु दिले नाही.
यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने जडेजाच्या ऐवजी बदली खेळाडू (कन्कशन सब्स्टीट्यूट) म्हणून आलेल्या युजवेंद्र चहलला आठव्या षटकात गोलंदाजी दिली. जडेजाला फलंदाजी करताना हेल्मेटला चेंडू लागल्याने तो गोलंदाजीसाठी मैदानात आला नाही. चहलने पहिल्याच षटकात फिंचला ३५ धावांवर बाद केले. पंड्याने त्याचा झेल घेतला.
९ व्या षटकात स्मिथने षटकार ठोकला. पण लगेचच १० व्या षटकात चहलने स्मिथला बाद केले. मिडविकेटच्या क्षेत्रात स्मिथचा अफलातून झेल सॅमसनने घेतला. स्मिथ १२ धावा करुन बाद झाला
११ व्या षटकात टी नटराजनने अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला बाद करत भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. मॅक्सवेलला पंचांनी आधी नाबाद दिले होते. पण भारताने डीआरएस रिव्ह्यू घेतला. यात मॅक्सवेल पायचीत झाल्याचे दिसल्याने त्याला विकेट गमवावी लागली. मॅक्सवेलने २ धावा केल्या.
१२ व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाने ३ बाद ८५ धावा केल्या आहेत. त्यांना अजून ४८ चेंडूत ७७ धावांची गरज असून मोझेल हेन्रीक्स २ धावांवर आणि शॉर्ट २९ धावांवर खेळत आहे.
जडेजाचे फटकेबाजी
या सामन्यात भारताने मधल्या फळीतील विकेट्स झटपट गमावल्या. १२ व्या षटकापर्यंत ३ विकेट्स गमावल्यानंतर अर्धशतकी खेळी केलेल्या केएल राहुलला साथ देण्यासाठी मनिष पांडे आला. परंतु, त्यानेही १३ व्या षटकात २ धावांवर विकेट गमावली. त्याला ऍडम झम्पाने बाद केले.
त्यानंतर १४ व्या षटकात केएल राहुलही बाद झाला. तो मोझेस हेन्रीक्सच्या गोलंदाजीवर सीन ऍबॉटकरवी झेलबाद झाला. राहुलने ४० चेंडूत ५१ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. याबरोबरच त्याने या खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १५०० धावांचा टप्पा पार केला आहे.
तो बाद झाल्यानंतर तिसऱ्या वनडेत दीडशतकी भागीदारी करणारी रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांची जोडी खेळपट्टीवर आली. या दोघांनी भारताचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. १५ व्या षटकात या दोघांनी एकेरी धावांवर भर दिला.
१६ व्या षटकात देखील जडेजा आणि पंड्याने एकेरी दुहेरी धावा काढल्या. त्यामुळे भारताने १०० धावांचा आकडा पार केला.
१७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पंड्याने षटकात ठोकला. मात्र पाचव्या चेंडूवर तो स्टीव्ह स्मिथच्या हातात झेल देऊन बाद झाला. तो १६ धावा करुन हेन्रीक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला.
१८ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने चौकार ठोकला तर जडेजाने एकेरी-दुहेरी धावा काढल्या. १९ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर जडेजाने षटकार ठोकला पण या षटकाच्या तिसऱ्या चेंडूनंतर जडेजाने ब्रेक घेतला. त्याने त्याच्या हॅमस्ट्रिंगवर काम करण्यासाठी हा ब्रेक घेतल्याची शक्यता आहे. यानंतर या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या सलग दोन चेंडूवर जडेजाने चौकार ठोकले आणि भारताला १५० धावांचा टप्पा पार करुन दिला.
स्टार्कने टाकलेल्या २० व्या षटकात दुसऱ्या जडेजा ३४ धावांवर असताना हेन्रीक्सकडून त्याचा झेल सुटला. पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर ७ धावांवर बाद झाला. मात्र जडेजाने त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग २ चौकार ठोकले आणि शेवटच्या चेंडूवर १ धाव काढत भारताला १६१ धावसंख्या गाठून दिली. जडेजाने ५ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या.
केएल राहुलने अर्धशतक केले
७ षटकांच्या आत भारताने विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या विकेट्स झटपट गमावल्यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेल्या केएल राहुलला साथ देण्यासाठी संजू सॅमसन आला. या दोघांनी ८ वे षटक एकेरी-दुहेरी धावा काढत पूर्ण केले. त्यानंतर ९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅमसनने मिशेल स्वेप्सनला षटकार ठोकला. याच षटकात पाचव्या चेंडूवर केएल राहुलने ४ चौकार ठोकला.
मोझेस हेन्रीक्सने टाकलेले १० वे षटकही एकेरी-दुहेरी धावा काढत सॅमसन आणि राहुलने खेळून काढले. ११ व्या षटकात चौथ्या चेंडूवर एकेरी धाव काढत राहुलने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३७ चेंडूत त्याचे आंतरराष्ट्रीय टी२०मधील १२ वे अर्धशतक पूर्ण केले.
त्याचे अर्धशतक झाल्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर सॅमसन २३ धावांवर बाद झाला. सॅमसन बाद झाल्यानंतर मनिष पांडे फलंदाजीसाठी आला आहे. भारताने १२ षटकात ३ बाद ८९ धावा केल्या आहेत.
विराट-शिखर झाले स्वस्तात बाद
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून शिखर धवन आणि केएल राहुल हे सलामीला फलंदाजीसाठी आले. पण सुरुवातीला सावध सुरुवात केलेल्या शिखरने तिसऱ्याच षटकात विकेट गमावली. त्याला मिशेल स्टार्कने त्रिफळाचीत केले. शिखरने ६ चेंडूत १ धाव केली.
Peach ????#AUSvIND pic.twitter.com/nO3UOQo2Qi
— ICC (@ICC) December 4, 2020
तो बाद झाल्यानंतर केएल राहुलला साथ देण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला आहे. या दोघांनी भारताला ६ षटकात ४२ धावांचा टप्पा पार करु दिला आहे. यामध्ये राहुलने काही आक्रमक फटके खेळले. त्याने २३ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या.
मात्र त्यानंतर विराट लगेचच ९ धावांवर ७ व्या षटकात बाद झाला. त्याला मिशेल स्वेप्सनने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
भारताने ७ षटकात २ बाद ५१ धावा केल्या आहेत. यावेळी केएल राहुल ३८ धावांवर खेळत आहे. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला संजू सॅमसन १ धावेवर नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या टी२० सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजन आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण करणारा भारताचा ८३ वा खेळाडू ठरला आहे.
तसेच पहिल्या टी२० सामन्यासाठी भारताने ११ जणांच्या संघात संजू सॅमसनला संधी दिली आहे. केएल राहुल शिखर धवनसह सलामीला फलंदाजी करेल. याबरोबच भारताने वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चाहरचाही अंतिम ११ जणांच्या संघात समावेश केला आहे.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी२० सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात डॉर्सी शॉर्टला सलामीवीर म्हणून संधी दिली आहे. तर मॅथ्यू वेड यष्टीरक्षणाबरोबरच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तसेच ऑस्ट्रेलिया संघात मिशेल स्टार्कचे पुनरागमन झाले आहे. तर ऍश्टन एगर दुखापतीमुळे या सामन्याला मुकल्याने मिशेल स्वेप्सनला अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ –
शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, मोहम्मद शमी, टी नटराजन
ऑस्ट्रेलिया संघ –
डॉर्सी शॉर्ट, ऍरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोझेस हेन्रीक्स, मिशेल स्वेप्सन, सीन ऍबॉट, मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेजलवुड




