सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी(६ डिसेंबर) झाला. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ बाद १९४ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल भारताने १९.४ षटकांत १९५ धावा करत सामना जिंकला.
भारताने १२ षटकापर्यंत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर १४ व्या षटकात लगेचच संजू सॅमसन १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याला ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती मिळाली. विराटने १५ व्या षटकात आक्रमक पवित्रा घेतला आणि २ चौकार आणि १ षटकार मारला. त्यामुळे या षटकात १८ धावा निघाल्या. पण १६ व्या षटकात विराट आणि पंड्याला एकेरी दुहेरी धावांवरच समाधान मानावे लागले.
१७ व्या षटकात कारकिर्दीतील पहिला टी२० सामना खेळणाऱ्या सॅम्सने विराटला ४० धावांवर बाद केले. यानंतर श्रेयस अय्यर ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने फलंदाजीला येताच १८ व्या षटकात १ षटकार आणि १ चौकार मारला. १९ व्या षटकात हार्दिक पंड्याने ४ चौकार मारले. त्यामुळे या षटकात एकूण ११ धावा निघाल्या. अखेरच्या षटकात भारताला १४ धावांची गरज होती. यावेळी हार्दिकने दुहेरी धावा आणि २ षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
अखेर हार्दिक २२ चेंडूत ४२ धावांवर आणि अय्यर ५ चेंडूत १२ धावांवर नाबाद राहिले.
ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स, अँड्र्यू टाय, मिशेल स्वीप्सन आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
शिखरचे अर्धशतक
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून केएल राहुल आणि शिखर धवन सलामीला फलंदाजीला आले. या दोघांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या दोन षटकात या दोघांनी एकेरी-दुहेरी धावा केल्या. तिसऱ्या षटकात राहुलने षटकार आणि शिखरने चौकार मारत त्यांचे इरादे स्पष्ट केले. या षटकात १५ धावा निघाल्या.
चौथ्या षटकात देखील राहुलने चौकार आणि शिखरने १ षटकार आणि १ चौकार मारला आणि १९ धावा वसूल केल्या. पाचव्या षटकातही या दोघांनी आक्रमक अंदाज कायम ठेवत १ चौकार आणि १ षटकारासह १३ धावा काढल्या. त्यामुळे भारताने ५ षटकातच ५० धावांचा टप्पा पार केला.
६ व्या षटकात मात्र राहुल अँड्र्यू टायच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल मिशेल स्विप्सनने डीप पाँइंटला क्षेत्ररक्षण करताना घेतला. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली शिखरला साथ देण्यासाठी आला या दोघांनी ७ व्या षटकात एकेरी धावांवर भर दिला. तर ८ व्या षटकात धवनने चौकार मारला. तर विराटने एकेरी धावा काढल्या. त्यामुळे या षटकात ९ धावा निघाल्या. ९ व्या षटकात विराट आणि शिखरने कोणताही फटका न खेळता एकेरी-दुहेरी धावा काढत या षटकात एकूण ८ धावा काढल्या.
१० व्या षटकात मात्र ऍडम झम्पाने विराट आणि शिखरला मोठे फटके खेळू दिले नाही. त्यामुळे या षटकात केवळ ५ धावा निघाल्या.
१० षटकात भारताने १ बाद ८६ धावा केल्या. शिखर ४५ धावांवर नाबाद आहे. तर विराट ८ धावांवर नाबाद आहे.
११ व्या षटकात पुन्हा विराट आणि शिखरने एकेरी आणि दुहेरी धावा काढल्या. याचदरम्यान शिखरने ३४ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतक पूर्ण करताच १२ व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात शिखर ऍडम झाम्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. स्वीप्सनने त्याचा झेल घेतला.
ऑस्ट्रेलियाचे भारताला १९५ धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना प्रभारी कर्णधार मॅथ्यू वेड आणि डॉर्सी शॉर्ट यांनी सलामीला फलंदाजी केली. वेडला या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फटके खेळताना १७ चेंडूतच ३४ धावा केल्या होत्या. मात्र शॉर्टला खास काही करता आले नाही. तो ९ चेंडूत ९ धावा करुन बाद झाला. त्याला टी नटराजनने ५ व्या षटकात बाद केले. त्याचा श्रेयस अय्यरने शानदार झेल घेतला.
त्यानंतर स्मिथने वेडला चांगली साथ दिली. दरम्यान ६ व्या षटकात हार्दिक पंड्याकडून वेडचा झेल सुटला. या जीवदानाचा फायदा घेत वेडने २५ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण तो लगेचच ८ व्या षटकात नाट्यपूर्णरित्या बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर वेडचा सोपा झेल विराटकडून सुटला मात्र वेडला हा झेल गेला असल्याचे वाटून तो पुढे जात असतानाच तो धावबाद झाला. वेडने ३२ चेंडूत ५८ धावा केल्या.
यानंतर स्मिथने मॅक्सवेलच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. या दोघांची ४५ धावांची भागीदारी रंगली असतानाच शार्दुल ठाकूरने मॅक्सवेलला बाद करत भारताच्या डावातील मोठा अडथळा दूर केला. मॅक्सवेल १३ चेंडूत २२ धावा करुन बाद झाला. पण त्यानंतरही स्मिथला मोझेस हेन्रीक्सने भक्कम साथ दिली.
हेन्रीक्स आणि स्मिथने ४८ धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला १६० धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र १७ व्या षटकात स्मिथ ४६ धावांवर असताना युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने त्याचा शानदार झेल घेतला. त्यापाठोपाठ १९ व्या षटकात मोझेस हेन्रीक्सही २६ धावा करुन टी नटराजनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात झेल देऊन बाद झाला. अखेरच्या षटकातच ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स झटपट घेतल्याने ऑस्ट्रेलियाच्या धावांना रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले.
२० षटकात ऑस्ट्रेलियाने १९४ धावा केल्या. त्याच्याकडून पदार्पण करणारा डॅनियल सॅम्स(८) आणि मार्कस स्टॉयनिस(१६) नाबाद राहिले.
भारताकडून टी नटराजनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताने जिंकली नाणेफेक
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम ११ जणांच्या संघात ३ बदल केले आहेत. दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाच्या ऐवजी युजवेंद्र चहलला संधी दिली आहे. तसेच मनिष पांडे ऐवजी श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे. तर मोहम्मद शमी ऐवजी शार्दुल ठाकूरला अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यांचा नियमित कर्णधार ऍरॉन फिंच दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. तसेच मिशेल स्टार्कही उर्वरित टी२० मालिकेतून वैयक्तिक कारणाने बाहेर झाला आहे. त्याचबरोबर जोश हेझलवूडही पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या टी२० सामन्यात खेळणार नाही.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रभारी कर्णधारपद मॅथ्यू वेड सांभाळेल. ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यातून डॅनियल सॅम्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. तर ऑस्ट्रेलियाने अँड्र्यू टाय आणि मार्कस स्टॉयनिसला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – केएल राहुल (यष्टीरक्षक), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, टी नटराजन, युजवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया – डॉर्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोझेस हेन्रीक्स, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक/कर्णधार), डॅनियल सॅम्स, सीन ऍबॉट, मिशेल स्वीप्सन, ऍडम झम्पा, अँड्र्यू टाय.