भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बहुप्रतिक्षित ४ सामन्यांच्या ‘बॉर्डर- गावसकर’ कसोटी मालिकेपूर्वी जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गज वेगवेगळे अनुमान मांडत आहेत. अशातच इंग्लंडचे माजी दिग्गज कर्णधार मायकल वॉन यांनी अंदाज वर्तवला आहे की जर ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना जिंकला, तर ते ४-० ने मालिका विजय मिळवतील.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत वॉन यांनी स्पष्ट केले की, “दोन वर्षांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आला होता, तेव्हा खूपच मजबूत होता. भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि आर अश्विनसारखे गोलंदाज होते तसेच फलंदाजीत द वॉल चेतेश्वर पुजारादेखील होता. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरत होते.”
“भारतीय संघ २०१८ मध्ये यशस्वी होण्याचे कारण स्टीव्ह स्मिथ, डेविड वार्नर आणि मार्नस लॅब्यूशाने हे खेळाडू संघात नव्हते. परंतु आता ऑस्ट्रेलिया मजबूत कसोटी संघ आहे. त्यांनी इंग्लंडला इंग्लंडमध्ये बरोबरीत रोखून ऍशेस आपल्याकडे ठेवली होती. भारताला या वेळी मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या तिकडीचा सामना करावा लागेल. कुकाबुरा चेंडूने ते भारतीय फलंदाजांना धावा बनवू देणार नाहीत,” असे वॉन यावेळी म्हणाले.
“गुलाबी चेंडूने होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आतापर्यंत अजेय राहिली आहे. त्यांनी प्रत्येक वेळी विरोधी संघाला पराभूत केले आहे. जर ऑस्ट्रेलियाने गुलाबी चेंडूने होणारा पहिला कसोटी सामना जिंकला, तर उर्वरित ३ सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाला ते पराभूत करतील,” असेही वॉन पुढे म्हणाले.
वॉन यांच्या मते, “वॉर्नरच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात भारताला फायदा होईल. ऑस्ट्रेलिया संघाकडून कोणते दोन फलंदाज डावाची सुरुवात करतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, तरीही स्मिथ, लॅब्यूशाने व मॅथ्यू हेड यांची जोडी उत्तम होत आहे. टीम पेनदेखील कसोटी कर्णधार म्हणून अधिक योग्य बनत आहे.”
वॉन शेवटी म्हणाले, “मी कोणत्याही संघाला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध धावा करताना बघितले नाही आणि त्याचमुळे मी ४-० अशी भविष्यवाणी करत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका
“भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज”, कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे वक्तव्य
“केएल राहुलची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसे खर्च करण्यासही तयार”, विंडीजच्या दिग्गजाने केली स्तुती