भारतीय संघ पुढील महिन्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. यामध्ये चेतेश्वर पुजाराचा समावेश नाही. आता भारतीय संघाच्या माजी मुख्य निवडकर्त्याने बोर्डाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताला अनुभवी फलंदाजाची उणीव भासेल, असे ते म्हणालेत.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्याशिवाय बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात इतर कोणत्याही अनुभवी फलंदाजाचा समावेश केलेला नाही. आता माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी पुजाराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, रणजी ट्रॉफीमध्ये पुजारा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याला ऑस्ट्रेलिया मालिकेत संधी मिळाली असती तर तो संघासाठी उपयुक्त ठरला असता. पुजाराने नुकतेच छत्तीसगडविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये नववे द्विशतक झळकावले होते.
प्रसाद म्हणाले, “पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले आहे. तो अनुभवी आहे, ज्याची भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात गरज आहे. मला वाटते की जर त्यांनी नितीश रेड्डीची निवड केली आहेच, तर ते किमान एका भारत अ सामन्याची वाट पाहू शकले असते आणि नंतर पुढे जाऊ शकले असते.” उल्लेखनीय आहे की 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्या मालिका विजयात पुजाराने भारतासाठी सर्वोच्च कामगिरी केली होती. त्याने सात डावात 74.42 च्या सरासरीने तीन शतके आणि एक अर्धशतकांसह 521 धावा केल्या होत्या. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
पुजाराचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम
पुजाराचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने 11 सामन्यात 47.28 च्या सरासरीने 993 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 2020-21 मालिकेतील प्रसिद्ध चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी गाबा येथे 56 धावांची (211) दमदार खेळी खेळली होती. त्यामुळे 329 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला गाबा कसोटी जिंकण्यात यश आले होते.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या-
राधा यादवने मागे धावताना हवेत उडी मारत पकडला झेल, जबरदस्त फिल्डिंग पाहून सगळेच थक्क!
‘या’ 5 संघांकडून भारत घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा पराभूत!
“गौतम गंभीर लवकरच…” भारताच्या पराभवानंतर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!