भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीत अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने शानदार कामगिरी केली आहे. या बाॅक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याने 140 कोटी भारतीयांंचे मान उंचावेल अशी कामगिरी केला आहे. 21 वर्षीय खेळाडूने या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) मध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय कसोटी शतक झळकावले आहे. त्याने 171 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ज्यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याने 81 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. नितीशने त्याच्या या खेळीने अनेक विक्रमांची मालिका रचली आहे.
आपल्या पहिल्याच ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात नितीशने अप्रतिम विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 76 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. नितीशने वयाच्या 21 वर्षे 216 दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने दत्तू फडकरला मागे टाकले. ज्याने 1948 मध्ये ॲडलेडमध्ये वयाच्या 22 वर्षे 46 दिवसांत कसोटी शतक झळकावले होते.
ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू
18 वर्षे 256 दिवस – सचिन तेंडुलकर सिडनी 1992
21 वर्षे 92 दिवस – रिषभ पंत सिडनी 2019
21 वर्षे 216 दिवस – नितीश रेड्डी मेलबर्न 2024
22 वर्षे 46 दिवस – दत्तू फडकर ॲडलेड 1948
ऑस्ट्रेलियात 8व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 2008 मध्ये ॲडलेड कसोटीत 87 धावा करणाऱ्या अनिल कुंबळेला मागे टाकले. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात पाच गड्यांच्या मोबदल्यात 164 धावांवर केली. रिषभ पंत (28) आणि रवींद्र जडेजा (17) पहिल्या सत्रात पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर नितीश यांनी वॉशिंग्टन सुंदर (50) यांनी पदभार स्वीकारला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली आणि भारताकडून फॉलोऑनचा धोका टळला.
नितीश आणि सुंदर या जोडीने ऑस्ट्रेलियात आठव्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी करण्याचा भारतीय विक्रम केला आहे. या दोघांनी 2008 मध्ये 127 धावांची भागीदारी करणारा कुंबळे आणि हरभजन सिंगचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी डावात भारताच्या आठव्या आणि नवव्या फलंदाजांनी 50 प्लस स्कोअर बनवण्याची ही दुसरी वेळ आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये भारतासाठी आठव्या किंवा त्याखालील सर्वोच्च धावसंख्या
100* नितीश रेड्डी मेलबर्न 2024
87 अनिल कुंबळे ॲडलेड 2008
81 रवींद्र जडेजा सिडनी 2019
67* किरण मोरे मेलबर्न 1991
67 शार्दुल ठाकूर ब्रिस्बेन 2021
ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांच्या प्रत्युत्तरात, भारताचा पहिल्या डावात 114.3 षटकात 9 बाद 354 धावा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी पदार्पण केल्यापासून नितीश उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
Nitish Kumar Reddy hits his maiden Test century and receives a standing ovation from the MCG crowd ❤️ #AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/Vbqq5C26gz
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2024
हेही वाचा-
IND vs AUS; रोहित शर्माबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “तो व्हीआयपी…”
नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नजरा सचिन-भज्जीच्या रेकॉर्डवर, 16 वर्ष जुना रेकॉर्ड मोडणार का?
IND vs AUS: नितीश कुमार रेड्डीने रचला इतिहास, असा विक्रम करणारा पहिला भारतीय