भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) रायपूरमध्ये ऑस्ट्रेलियाला चौथ्या टी20 सामन्यात 20 धावांनी नमवले. या विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-1ने आघाडी घेतली. एवढंच नाही, तर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मोठ्या विक्रमात पाकिस्तानला पराभूत करत इतिहासही घडवला. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा देश बनला आहे.
भारतीय संघाचा विक्रम
भारतीय संघ (Team India) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 136वा विजय मिळवणारा (India win 136th T20 match) संघ बनला. या बाबतीत भारताने पाकिस्तानला पछाडले. पाकिस्तानने टी20 क्रिकेटमध्ये एकूण 135 सामने जिंकले आहेत.
भारतीय गोलंदाजांची कमाल
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 174 धावा केल्या होत्या. अशात भारतीय गोलंदाजांनी 175 धावांचा यशस्वी बचाव केला. अक्षर पटेल (Axar Patel) याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 16 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. तसेच, दीपक चाहर याच्या खात्यात 2 विकेट्स पडल्या. रवी बिश्नोईनेही फायदेशीर गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 17 धावा खर्चून जोश फिलिप याची मोठी विकेट नावावर केली.
A special win in Raipur 👏#TeamIndia now has the most wins in Men's T20Is 🙌#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/edxRgJ38EG
— BCCI (@BCCI) December 1, 2023
रिंकूचा झंझावात
चौथ्या टी20त रिंकू सिंग (Rinku Singh) याच्या बॅटमधून शानदार खेळी निघाली. रिंकूने 29 चेंडूंचा सामना करताना 46 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 2 गगनचुंबी षटकार आणि 4 चौकारही मारले. रिंकूने ऋतुराज गायकवाड याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने पाचव्या विकेटसाठी जितेश शर्मा (35) याच्यासोबत मिळून वादळी अर्धशतकी भागीदारी केली. त्याच्या जोरावर भारतीय संघ 174 धावांपर्यंत मजल मारू शकला.
मालिकेतील अखेरच्या म्हणजेच पाचव्या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ रविवारी (दि. 1 डिसेंबर) भिडणार आहेत. (ind vs aus t20 series team india created history and they have most t20i wins after defeating australia in 4th t20)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला धूळ चारताच कॅप्टन सूर्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला त्याला दबावात टाकायला आवडते…’
चौथ्या टी-20 ऑस्ट्रेलियाला नाही गाठता आले 175 धावांचे आव्हान! भारताने साकारला सूर्यकुमारच्या नेतृत्वात पहिला मालिका विजय