टीम इंडिया आज (24 जून) टी20 विश्वचषक 2024 मधील सुपर-8 चा आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारतानं सुपर-8 चे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात काही बदल होतील का? एखाद्या खेळाडूला विश्रांती मिळू शकते का? चला तर मग, या बातमीद्वारे जाणून घेऊया की कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरू शकतो.
यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला मधल्या फळीत खेळवण्याची जोरदार चर्चा आहे. संजूला शिवम दुबेच्या जागी मधल्या फळीत खेळवलं जावं, असं अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे. दुबेनं विश्वचषकात आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसली, तरी बांगलादेशविरुद्ध त्यानं चांगली खेळी करत 34 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता नाही. म्हणजेच, संजू सॅमसनला टी20 विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मानं प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला होता. रोहितनं मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान दिलं होतं. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच प्लेइंग 11 सह मैदानात उतरू शकते.
भारतानं न्यू यॉर्कमध्ये ग्रुप स्टेजचे सामने खेळले, जिथे वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळाली. त्यामुळे रोहित शर्मानं प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मुख्य वेगवान गोलंदाजांचा समावेश केला होता. पण आता सुपर-8 सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जात आहेत, जिथे फिरकीपटूंना मदत मिळते. त्यामुळे रोहित शर्मानं संघात तीन फिरकीपटूंची निवड केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द झाल्यास कोणाचा फायदा? सेमीफायनलचं समीकरण समजून घ्या
“अफगाणिस्तान भारताविरुद्ध जाणूनबुजून हरला”, पाकिस्तानी पत्रकाराचे बिनबुडाचे आरोप; आर अश्विनचं प्रत्युत्तर
अमेरिकेविरुद्ध आलं जोस बटलरचं वादळ! युवराज सिंगचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला