रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. यासह भारतानं दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघानं आर अश्विनचं शतक व रवींद्र जडेजा आणि यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात 376 धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर आटोपला. 227 धावांची आघाडी असतानाही भारतानं बांगलादेशला फॉलोऑन दिला नाही.
टीम इंडियानं शुबमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकांच्या जोरावर दुसरा डाव 287 धावांवर घोषित केला. यासह बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं लक्ष्य मिळालं. या लक्ष्यासमोर बांगलादेशचा संघ 234 धावांवर गडगडला. अश्विननं भारतासाठी सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. या सामन्यात घडलेल्या 5 मोठ्या गोष्टी आपण या बातमीद्वारे जाणून घेऊया..
(1) रविचंद्रन अश्विनचं धडाकेबाज शतक – आर अश्विननं घरच्या मैदानावर बॉलसह बॅटनंही चमत्कार केला. पहिल्या डावात तो कठीण परिस्थितीत फलंदाजीला आला. त्यानं 113 धावांची दमदार खेळी खेळली. त्याच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या डावात 350 धावांचा आकडा पार करता आला. एकेकाळी भारत 250 धावाही करू शकणार नाही, असं वाटत होतं. परंतु अश्विननं टीम इंडियाला 376 धावांपर्यंत नेलं.
(2) अश्विन-जडेजाची निर्णायक भागीदारी – नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी निराशा केली. एक वेळ अशी होती, जेव्हा टीम इंडियानं 144 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर आर अश्विननं रवींद्र जडेजासोबत 7व्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी करून संघाला अडचणीतून काढलं. ही भागीदारी भारतासाठी निर्णायक ठरली, कारण यानंतर बांगलादेशचा संघ दबावाखाली दिसला.
(3) रिषभ पंतचं शानदार कमबॅक – कार अपघातानंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतसाठी हा कसोटी सामना खूपच चांगला राहिला. पंतला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही, परंतु त्यानं दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावलं. पंतनं आपल्या खेळीत 13 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार मारले. रिषभ पंतचं कसोटी क्रिकेटमधील हे 6वं शतक आहे. यासह तो भारतासाठी या फॉरमॅटमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक शतकं करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. धोनीच्याही नावावर कसोटीमध्ये एवढीच शतकं आहेत.
(4) दुसऱ्या डावात गिलचं शतक – दुसऱ्या डावात रिषभ पंतसोबत शुबमन गिलनंही शतक झळकावलं. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्यानं आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. गिलनं दुसऱ्या डावात 119 धावा केल्या. भारतानं 67 धावांवर 3 विकेट गमावल्या असताना त्यानं पंतसोबत महत्त्वाची भागीदारी केली.
अश्विन-जडेजाच्या फिरकीत अडकला बांगलादेश – बांगलादेशनं आजपर्यंत कधीही कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठलेलं नाही. त्यामुळे भारतानं दिलेले 515 धावांचं लक्ष्य त्यांच्यासाठी खूप मोठे होतं. या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अश्विन-जडेजाच्या फिरकी जोडीनं बांगलादेशला 234 धावांवर रोखलं. अश्विननं 6 तर जडेजानं 3 विकेट घेतल्या.
हेही वाचा –
‘हिटमॅन’नं सचिनला मागे टाकलं! जागतिक क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
चेन्नई कसोटीच्या दिमाखदार विजयानंतर दुसऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा: पाहा बदल
चेन्नई कसोटीत भारताचा शानदार विजय; आर अश्विनचा डबल धमाका, बॅटिंगपाठोपाठ बॉलिंगमध्येही कमाल!