भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांनंतर क्रिकेट संघातील खेळाडूंसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र, सामन्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेनं शुक्रवारी सकाळी बांगलादेशचा झेंडा जाळून गोंधळ घातला. यावेळी, काही लोकांनी बांगलादेशचा चाहता टायगर रॉबीला मारहाण करून त्याच्याकडून ध्वज हिसकावून घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. यादरम्यान रॉबीही जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.
आता स्थानिक पोलिसांनी एक निवेदन जारी करून त्याच्यावरील प्राणघातक हल्लाची बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे. रॉबीनं हॉस्पिटलमधील एका व्हिडिओद्वारे सांगितलं की, त्याची तब्येत खराब आहे, त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याच्या पोटाच्या खालच्या बाजूला दुखापत झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
टायगर रॉबीनं ‘स्पोर्ट्सस्टार’ला सांगितलं होतं की, “त्यांनी मला पाठीवर आणि खालच्या पोटावर मारलं. मला श्वास घेता येत नाहीये.” मात्र या प्रकरणाबाबत एक नवीन अपडेट समोर आलं आहे. ‘रेव्ह स्पोर्ट्स’शी बोलताना कानपूर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याची घटना चुकीची असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे टायगरला रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं आहे.
मैदानावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला आहे. एका पोलिस सूत्रानं सांगितलं की, “आमच्या एका अधिकाऱ्याने त्याला सी ब्लॉकच्या एंट्री गेटजवळ श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं पाहिले. हे डिहायड्रेशनचं प्रकरण असल्याचं दिसतं. परंतु आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याची प्रतीक्षा करू.”
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ मुसळधार पावसामुळे लवकर संपला. खेळ थांबला तोपर्यंत बांगलादेशनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या होत्या. बांगलादेशनं उपाहारानंतरच्या सत्रात 9 षटकांच्या खेळात 33 धावा जोडल्यानंतर कर्णधार नझमुल हसन शांतोची (31) विकेट गमावली.
हेही वाचा –
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग, लवकरच खेळ संपला
विराट कोहलीची क्रेझ! 15 वर्षाच्या मुलानं भेटण्यासाठी चालवली चक्क 58 किमी सायकल
कानपूर कसोटीत राडा! बांगलादेशच्या चाहत्याला बेदम मारहाण, हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल