भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा फलंदाज मोमिनुल हकनं लंच ब्रेकच्या आधी आपलं शतक पूर्ण केलं. मोमिनुलनं 66व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून हा टप्पा गाठला.
मोमिनुल या मालिकेत शतक ठोकणारा बांगलादेशचा पहिला फलंदाज आहे. मात्र या शतकाबरोबरच त्यानं एका नकोश्या लिस्टमध्ये आपलं नाव नोंदवलं. मोमिनुलनं भारतीय भूमीवर पहिलं कसोटी शतक झळकावण्यापूर्वी सर्वात कमी सरासरी (किमान पाच डाव) राखण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगला मागे टाकलं आहे.
भारतामध्ये पहिलं कसोटी शतक झळकावण्यापूर्वी पाँटिंगची येथील खेळपट्ट्यांवरील सरासरी 12.29 एवढी होती. या शतकापूर्वी मोमिनुलची भारतामधील सरासरी 12 होती. या खेळीपूर्वी त्यानं भारतीय खेळपट्ट्यांवर आठ डावांत केवळ 96 धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर माईक गॅटिंग आहे, ज्यानं भारतात पहिलं कसोटी शतक झळकावण्यापूर्वी भारतीय खेळपट्ट्यांवर सात डावांत 83 धावा केल्या होत्या. येथे त्याची सरासरी 13.83 होती.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमबद्दल बोलायचं झालं तर, 1984 पासून येथे खेळल्या गेलेल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावणार मोमिनुल हक हा केवळ दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी 2004 मध्ये अँड्र्यू हॉलनं येथे 163 धावांची इनिंग खेळली होती. कानपूर कसोटी ज्या प्रकारे पुढे जात आहे, ते पाहता ती अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे.
कानपूर कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ झाला. त्यानंतर पावसामुळे दोन दिवस एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा चौथा दिवस असून पहिल्या डावाची फलंदाजी सुरू आहे. उद्या सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागणं अवघड आहे.
हेही वाचा –
अद्भूत, अविश्वसनीय!! मोहम्मद सिराजचा मागे डाइव्ह मारत खतरनाक झेल; VIDEO एकदा पाहाच
अवघ्या 25 वर्षाच्या पठ्यानं मोडला किंग कोहलीचा विराट विक्रम, अशी कामगिरी करणारा एकमेव
रोहित नाही ‘सुपरमॅन’ म्हणा! एका हातानं असा झेल घेतला, ज्यावर कोणाचाच विश्वास बसेना! VIDEO