भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई येथे होणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा कसोटी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा 2024 च्या टी 20 विश्वचषकानंतर ॲक्शनमध्ये दिसणार आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या जडेजाला बांग्लादेश मालिकेत मजबूत विक्रम करण्याचे लक्ष्य असेल. तो 6 विकेट घेताच एक मोठी कामगिरी करेल आणि कपिल देव आणि आर अश्विनच्या क्लबमध्ये प्रवेश करेल.
जडेजा कसोटी सामन्यात 3000 धावा आणि 300 बळी घेणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत त्याने 72 कसोटी सामन्यांमध्ये 3036 धावा केल्या असून 294 बळी घेतले आहेत. जडेजाने डिसेंबर 2012 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या आधी 1983 च्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणाऱ्या कपिल देवने 131 कसोटी सामन्यात 5248 धावा केल्या आणि 434 बळी घेतले. त्याचबरोबर अश्विनने आतापर्यंत 100 कसोटींमध्ये 3309 धावा करत 516 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
जडेजा 6 विकेट घेतल्यानंतर केवळ कपिल-अश्विनच्या क्लबमध्ये सामील होणार नाही तर एका खास यादीतही स्थान मिळवेल. 300 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा तो सातवा भारतीय गोलंदाज ठरेल. त्याच्या आधी अनिल कुंबळे, हरभजन सिंग, झहीर खान, कपिल, अश्विन आणि इशांत शर्मा यांनी ही कामगिरी केली आहे.
भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी
अनिल कुंबळे- 619
आर. अश्विन-516
कपिल देव- 434
हरभजन सिंग- 417
झहीर खान- 311
इशांत शर्मा- 311
रवींद्र जडेजा- 294
बांग्लादेश मालिकेसाठी चेपॉक मैदानावर सराव सत्रादरम्यान भारतीय खेळाडूंनी घाम गाळला. रविवारी विश्रांतीनंतर सोमवारी खेळाडूंनी तिसऱ्या सराव सत्रात भाग घेतला. जडेजा, यष्टिरक्षक फलंदाज jfषभ पंत आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनीही स्थानिक गोलंदाज आणि थ्रोडाउन तज्ज्ञांविरुद्ध सराव केला. चेन्नईची खेळपट्टी साधारणपणे फिरकीपटूंना अनुकूल असते. अशा स्थितीत भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा-
“सर्वात वेगवान 50 पासून 500 विकेट्सपर्यंतचा विक्रम”, वाढदिवसादिनी जाणून घ्या दिग्गज फिरकीपटूचे खास रेकाॅर्ड्स
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 भारतीय गोलंदाज, दिग्गज फलंदाजाचाही समावेश
हॉकीमध्ये ‘पंजा’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, आज यजमान चीनविरुद्ध विजेतेपदाचा सामना