बांग्लादेशचा कसोटी मालिकेत 2-0 असा धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया आता 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. 6 ऑक्टोबरपासून ग्वालियार येथे टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल आणि त्यानंतर हैदराबादमध्ये तिसऱ्या सामन्याने मालिकेचा समारोप होईल.
या मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा आधीच करण्यात आली होती. संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. संपूर्ण भारतीय संघ बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत धमाका करण्यास सज्ज असला तरी सर्वांच्या नजरा विशेषत: कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या फलंदाजीवर असतील. वास्तविक सूर्या आणि शिवम गेल्या काही दिवसांपासून टी20 क्रिकेटमध्ये जोरदार फलंदाजी करत आहेत. यावर्षी ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. आगामी मालिकेतही या दोन्ही फलंदाजांची फलंदाजी अशीच सुरू राहिल्यास रोहित शर्माचा मोठा विक्रम मागे राहील.
टी20 क्रमवारीत नंबर 2 फलंदाज असलेल्या सूर्याने यावर्षी 11 सामन्यांमध्ये 150 च्या स्ट्राइक रेटने 291 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. जर सूर्याने पुढील 3 सामन्यात 88 धावा केल्या तर तो रोहित शर्माला मागे टाकत यावर्षी सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल. टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर रोहितने क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाचा निरोप घेतला आहे. अशा परिस्थितीत सूर्याकडे रोहितला मागे सोडण्याची मोठी संधी आहे.
रोहितच्या नावावर यावर्षी 11 टी20 सामन्यात 378 धावा आहेत. सूर्याशिवाय शिवम दुबेलाही रोहितला मागे टाकण्याची मोठी संधी आहे. शिवमने यावर्षी 15 सामन्यांच्या 13 डावात 296 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत शिवम दुबेला रोहित शर्माला मागे सोडण्यासाठी फक्त 83 धावांची गरज आहे. आता सूर्या आणि शिवम पैकी कोण रोहितला कोण मागे टाकतो हे पाहणं रंजक राहील.
या वर्षी (2024) मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय
रोहित शर्मा- 378
शिवम दुबे- 296
यशस्वी जयस्वाल- 293
सूर्यकुमार यादव- 291
शुबमन गिल- 266
हेही वाचा-
द्विशतक हुकले पण टीम इंडियासाठी दावा मजबूत, इराणी कपमध्ये या खेळाडूची मोठी कामगिरी
सर्फराज खान भावूक, दुखापतग्रस्त भाऊ मुशीरला समर्पित केली द्विशतकी खेळी
वयाच्या 12 व्या वर्षी दिल्लीला पोहोचला, राहण्यासाठी घर नव्हते; या स्टार खेळाडूची कारकीर्द खूपच संघर्षमयी