भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले. या कसोटी सामन्यात डाव्या हाताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यानं पदार्पण केलं. रजत पाटीदार काल संध्याकाळी नेट्समध्ये सराव करताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी देवदत्तला संधी मिळाली आहे.
23 वर्षीय देवदत्त पडिक्कल भारताकडून कसोटी खेळणारा 314 वा खेळाडू ठरला. तो या आधी भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्यानं भारतासाठी 2 टी-20 सामने खेळले आहेत. देवदत्त पडिक्कलनं अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन करत भारतीय कसोटी संघात स्थान मिळवलं. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी खेळतो. त्यानं 31 प्रथम श्रेणी आणि 30 लिस्ट ए सामने खेळले आहेत.
देवदत्त पडिक्कलनं 31 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44.54 च्या उत्कृष्ट सरासरीनं 2227 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 6 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 193 धावा ही त्याची प्रथम श्रेणी सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्या. देवदत्तनं लिस्ट ए सामन्यांमध्येही आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. त्याच्या नावे 30 सामन्यांमध्ये 81.52 च्या उत्कृष्ट सरासरीनं 1875 धावा आहेत. या दरम्यान त्यानं 8 शतकं आणि 11 अर्धशतकं ठोकली. 152 ही त्याची लिस्ट ए सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
देवदत्त पडिक्कलनं आजच्या सामन्यात पदार्पण करताच भारतीय क्रिकेटचा 24 वर्षे जुना विक्रम मोडला गेला. मायदेशात तब्बल 5 भारतीय खेळाडूंनी एकाच मालिकेत पदार्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेत यापूर्वी रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि आकाश दीप यांनी पदार्पण केलं होतं.
यापूर्वी 2000 साली हा विक्रम बनला होता. तेव्हा 4 भारतीय खेळाडूंनी मायदेशात एकाच मालिकेतून कसोटी पदार्पण केलं होतं. 2000 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत मुरली कार्तिक, वसीम जाफर, मोहम्मद कैफ आणि निखिल चोप्रा यांना पदार्पणाची संधी मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यानं कदाचित ऋषभ पंतला खेळताना पाहिलं नसेल’, इंग्लिश फलंदाजाच्या कमेंटवर रोहितचं चोख प्रत्युत्तर
आयपीएलमध्ये ‘सूर्या’ तळपणार! शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सुरू केली बॅटिंग
धरमशाला कसोटीत इंद्रदेव येईल ‘साहेबां’च्या मदतीला? जाणून घ्या हवामानाचा अंदाज