धरमशाला येथे सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवलंय.
पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल अर्धशतक करून बाद झाला. यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं शतकं झळकावली. आज मैदानात आलेल्या सरफराज खाननंही झंझावाती अर्धशतक झळकावलं. आता पदार्पण करत असलेल्या देवदत्त पडिक्कलनंही 83 चेंडूत अर्धशतक झळकावून दमदार कामगिरी केली आहे. पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या पडिक्कलनं षटकार ठोकून अर्धशतक साजरं केलं. यावेळी पॅव्हेलियनमधील सर्वजण त्याच्या सन्मानार्थ उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले.
पडिक्कलनं 87 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शोएब बशीरला लाँग ऑनला षटकार ठोकून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. याच मालिकेतून पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारच्या जागी पडिक्कलला प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आली होती. पडिक्कल एकेकाळी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. नंतर तो राजस्थान रॉयल्समध्ये गेला. सध्या तो लखनऊ सुपरजायंट्कडून खेळतो आहे.
या सामन्यात पडिक्कल 103 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 10 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याला शोएब बशीरनं बोल्ड केलं. बशीरची ही तिसरी विकेट होती. तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना टीम इंडियाच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. पदार्पणाच्या डावातच अशा प्रकारची खेळी दाखवते की तुम्ही कोणत्या स्तराचे फलंदाज आहात.
येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, पडिक्कलनं गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली. तो आज ज्या प्रकरे खेळत होता, ते पाहून एकवेळ तो पदार्पणातच शतक मारतो की काय, असं वाटत होतं. मात्र शोएब बशीरचा एक चेंडू खेळताना त्याच्याकडून चुकला आणि त्याची विकेट पडली. असं असलं तरी पडिक्कलनं आपल्या या खेळीनं क्रिकेट चाहत्यांची मनं मात्र जिंकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक
शुबमन गिलचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ठोकलं शानदार शतक
डॉन ब्रॅडमननंतर यशस्वीचाच नंबर! क्रिकेटच्या ‘या’ खास लिस्टमध्ये मिळवलं स्थान