भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना शुक्रवार, 20 जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणार आहे. या सामन्यात भारत काही प्रमुख वरिष्ठ खेळाडूंशिवाय उतरणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी आणि अजिंक्य रहाणे हे सर्व दिग्गज खेळाडू पहिल्या कसोटीत खेळणार नाहीत. रोहित विराटने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
या सामन्याआधी, अजिंक्य रहाणेने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर करत आपली संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. विशेष म्हणजे त्याने करुण नायर आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान दिलेले नाही.
रहाणेच्या निवडीनुसार, केएल राहुल आणि यशस्वी जायसवाल ही सलामी जोडी असेल, तर तिसऱ्या क्रमांकावर पदार्पण करणारा साई सुदर्शन खेळेल. कर्णधार शुबमन गिल चौथ्या स्थानी असेल. पाचव्या स्थानासाठी ध्रुव जुरेलची निवड झाली असून, त्यानंतर रिषभ पंत, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर हे अष्टपैलू असतील. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि डावखुरा अर्शदीप सिंह हे तिघे असतील.
करुण नायरने 8 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत पुनरागमन केले आहे, तर प्रसिद्ध कृष्णा नुकत्याच संपलेल्या IPL 2025 मध्ये पर्पल कॅप विजेता ठरला होता. तरीही या दोघांना रहाणेने संघात स्थान दिलेले नाही.
शुबमन गिलच्या नेतृत्वाबाबत बोलताना रहाणे म्हणाला, “शुबमनसाठी ही एक मोठी जबाबदारी असेल. टेस्ट क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून खूप अॅक्टिव्ह राहावं लागतं. टी20 आणि वनडेपेक्षा टेस्टमध्ये नेतृत्व वेगळं असतं. विरोधकांपेक्षा एक-दोन पावलं पुढं राहावं लागतं. मला खात्री आहे की शुबमन चांगलं कामगिरी करेल, पण त्याला वेळ लागेल.”
अजिंक्य रहाणेची संभाव्य प्लेइंग 11:
यशस्वी जायस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.






