IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत 359/3 अशी भक्कम धावसंख्या उभारली. दिवसाचा शेवट भारतीय कर्णधार शुबमन गिल (127*) आणि उपकर्णधार रिषभ पंत (65*) यांच्या अप्रतिम भागीदारीने झाला.
दिवसाची सुरुवात यशस्वी जायस्वाल (101) आणि केएल राहुल (42) यांच्या भक्कम 91 धावांच्या सलामीने झाली. जरी राहुल आणि पदार्पण करणारा साई सुदर्शन (0) झटपट बाद झाले, तरी गिल आणि जायस्वालने डाव पुन्हा सावरला. गिलने नेतृत्वाला साजेशी खेळी करत संयमी पण प्रभावी शतक झळकावले. त्याने 175 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि एका षटकारासह 127 धावा केल्या.
दुसऱ्या बाजूला जायस्वालने 159 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि एका षटकारासह 101 धावा करत केएल राहुल आणि गिलसोबत मजबूत भागीदारी केली, त्याच्या शतकाने भारताला भक्कम पायाभूत आधार दिला. त्यानंतर पंतने संयमी आणि आक्रमक अशा शैलीत फलंदाजी करत 102 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 65धावा केल्या.
दिवसाच्या अखेरीस पंतने ख्रिस वोक्सच्या षटकात उत्तुंग षटकार लगावत आपली झुंजार शैली दाखवून दिली. त्याच वेळी, जेव्हा गिल आणि पंत ड्रेसिंग रूममध्ये परतले, तेव्हा संपूर्ण संघाने टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले. विशेषतः केएल राहुलने पंतला हात जोडत वाकून सलाम केला, हा क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ-
???????????? ????????????????????????????????
— BCCI (@BCCI) June 20, 2025
Straight from the #TeamIndia Dressing Room after the end of an exciting Day 1 at Headingley#ENGvIND pic.twitter.com/oj4kWMSbeW
या सामन्यातील आपल्या खेळीदरम्यान, रिषभ पंतने कसोटीत 3000 धावांचा टप्पा पार केला. यासोबतच त्याने माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत SENA देशांतील (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून नोंद केली. पंतने SENA देशांमध्ये 27 कसोटींमध्ये 1746 धावा केल्या असून त्यात 4 शतके आणि 6 अर्धशतके आहेत.
भारताने हेडिंग्लेमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इतिहास रचत इंग्लंडमध्ये कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या दिवसावर लागल्या आहेत, जिथे भारत अजून भक्कम आघाडी घेऊ शकतो.






