इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना अतिशय चित्तथरारक राहिला. सामन्याच्या शेवटपर्यंत यजमानांचे वर्चस्व दिसत असताना पाहुण्यांनी सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर १५१ धावांनी विजयी पताका झळकावली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच प्रतिस्पर्धी संघातील वादांमुळेही हा सामना चर्चेत राहिला. अशात भारतीय संघातील काही राखीव खेळाडूंनी इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सनला फलंदाजीसाठी मैदानावर जाण्यापासून अडवले असल्याचे खळबळजनक वृत्त पुढे येते आहे.
हा सर्व प्रकार लॉर्ड्स कसोटीतील इंग्लंडच्या दुसऱ्या अर्थात सामन्यातील चौथ्या अन् शेवटच्या डावादरम्यान घडल्याचे समजत आहे. ‘द गार्डियन’मधील वृत्तानुसार, “रॉबिन्सन जेव्हा फलंदाजीसाठी ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांवरुन खाली उतरत होता. तेव्हा भारतीय संघातील २ राखीव खेळाडू पायऱ्यांवर थांबले होते. त्यामुळे रॉबिन्सनला खाली उतरण्यासाठी जागा नव्हती. हे खेळाडू नुकतेच मैदानातील आपल्या सहकाऱ्यांना डिंक्स देऊन परतले होते.”
“म्हणून रॉबिन्सन शांतपणे उभा राहून त्यांची सरकण्याची वाट पाहू लागला. तरीही हे खेळाडू बाजूला सरकले नाहीत. अखेर रॉबिन्सन त्या भारतीय खेळाडूंच्या मधून कशीबशी वाट काढत मैदानावर गेला. ही घटना केवळ काही सेकंदच चालली.” असे असले तरीही, अद्याप त्या २ राखीव खेळाडूंची नावे पुढे आलेली नाहीत. तसेच ही घटनाही सत्य असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
लॉर्ड्स कसोटीत पाहायला मिळाले भरपूर वाद
लॉर्ड्स कसोटीदरम्यान भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडूंमध्ये बऱ्याचदा शाब्दिक चकमकी झाल्याची दृश्ये पाहायला मिळाली. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन यांच्यातील विवाद, वेगवान बाउन्सरमुळे अंडरसनची बुमराहला फटकार, कमी प्रकाशाचे कारण देत दिवसाचा खेळ थांबवल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटची रिषभ पंतला खरीखोटी ऐकवणे, शेवटच्या दिवशी मार्क वुड आणि बुमराह यांच्यातील चकमक असे बरेचसे छोट्यामोठ्या विवादाचे प्रसंग घडले.
इतकेच नव्हे तर, खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंडच्या सामना दर्शकांनीही भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला होता. कर्णधार कोहलीला डीआरवरुन बरेवाईट बोलणे, शतकवीर केएल राहुलवर शॅम्पेन कॉर्क फेकणे, असे प्रसंग या सामन्यादरम्यान घडले.
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकचे टी२० विश्वचषक विजेत्याविषयी भाकित; म्हणाला, भारत नाही ‘हा’ संघ ठरेल विजयी
पंतमुळे ‘या’ वरिष्ठ यष्टीरक्षकाच्या कसोटी कारकिर्दीवर पूर्णविराम! उरलाय केवळ निवृत्तीचा पर्याय






