भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीने संपली. ओव्हल येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत भारताने अवघ्या 6 धावांनी थरारक विजय मिळवला. ही भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावांमध्ये मिळालेली मोठी विजय ठरली. या मालिकेनंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका करणाऱ्यांना माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक नवज्योत सिंग सिद्धूंनी जोरदार उत्तर दिलं आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सिद्धूंनी म्हटलं, “आपल्याकडे ‘हीरो वर्शिप’ खूप होते. पण ऑस्ट्रेलियात तसं नाही. तिथं तुमचं काम संपलं की दुसरा कुणीतरी येतो. भारतात मात्र टीम जर थोडं वाईट खेळली की कोणताही ‘ऐरा गैरा नत्थू खैरा’ गंभीरवर बोलतो. सगळं दोष त्याच्यावर टाकलं जातं. पण आता तरी उभं राहून त्याचं स्वागत कराल का?”
सिद्धूंनी पुढे म्हटलं, “गंभीरने ट्रांजिशनवर भर दिला. आकाशदीप, वॉशिंगटन सुंदर यांसारख्या खेळाडूंना संधी दिली. कदाचित कुलदीप यादव एक चांगला पर्याय असता, पण कोचचा दृढ विश्वास काही वेगळाच होता. सुधारण्याची गरज आजही आहे आणि उद्याही राहील. पण ज्याच्यावर इतकी टीका झाली, त्याला आज तो सन्मान द्या, ज्याचा तो खरोखर हकदार आहे. मी त्याला तो सन्मान देतो.”
त्यांनी असंही नमूद केलं, “जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला, तेव्हा संघात अनेक अपरिचित चेहरे होते. गंभीर म्हणाला होता की संघात तीन-चार मोठी नावं नाहीत, याकडे तुम्ही कमकुवतपणा म्हणून पाहू शकता किंवा याकडे स्वतःला सिद्ध करण्याची संधी म्हणून बघा.”






