इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. याबरोबरच, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल संघात परतले आहेत. तसेच बिहारचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला प्रथमच भारतीय संघात संधी मिळाली आहे.
याबरोबरच, भारतीय निवडकर्त्यांनी मालिकेतील तीन सामन्यांसाठी आकाश दीपचा टीम इंडियामध्ये बॅकअप वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंडचे संघ आतापर्यंत झालेल्या दोन कसोटीत 1-1 ने बरोबरीत आहेत.
तर, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त, आकाश दीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उर्वरित भारत आणि बंगालचे प्रतिनिधित्व केले आहे. आकडेवारी दर्शवते की आकाश दीपने 29 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3.04 इकॉनॉमी आणि 23.18 च्या सरासरीने 103 विरोधी फलंदाजांना बळी बनवले आहे.
आकाश दीपने लिस्ट-ए सामन्यांमध्ये 24.50 च्या सरासरीने आणि 30.4 च्या स्ट्राइक रेटने 42 बळी घेतले आहेत. याशिवाय 41 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 7.52 च्या इकॉनॉमी आणि 18.1 च्या स्ट्राइक रेटसह 48 विरोधी फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. अलीकडेच आकाश दीप इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळताना दिसला होता. आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. मात्र, आकाश दीप इंग्लंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल.
पुढीलप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघ :-
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल (फिटनेस), रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरैल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेस), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार और आकाश दीप.