भारतीय संघ या महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. १५ जून रोजी बीसीसीआयने या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणाही केली. या मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले गेले आहे. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. परंतु आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी महत्वपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या राहुल तेवतिया याला राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही. त्यानंतर तेवतियाने ट्वीटर पोस्टच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. पण दक्षिण आफ्रिकी दिग्गज ग्रीम स्मिथने तेवतियाला एक खोचक सल्ला दिला आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने जो १७ सदस्यांचा संघ घोषित केला, त्यामध्ये राहुल तेवतियाचे नाव नव्हते. आयपीएलमध्ये तेवतियाने गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती, ज्यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळेल असे अनेकांना वाटत होते. परंतु निवडकर्त्यांनी त्याला संघात घेतले नाही. याच पार्श्वभूमीवर राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याने ट्वीट केले होते की, “अपेक्षा वेदना देतात.”
आता तेवतियाच्या याच ट्वीटला लक्ष्य करून दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केलेल्या ग्रीम स्मिथने स्वतःची भूमिका मांडली आहे. स्मिथने तेवतियाला स्वतःच्या खेळावर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना ग्रीम स्मिथ (Graeme Smith) म्हणाला की, “भारतात हे (संघात निवड होणे) खूप अवघड आहे, कारण तिथे लोकांकडे खूप गुणवत्ता आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला लक्षात घेऊन संघाची निवड केली असेल. मी म्हणेल की, ट्वीटरपेक्षा तुम्ही स्वतःच्या प्रदर्शनावर लक्ष द्या. जेव्हा पुन्हा कधी तुमची वेळ येईल, तेव्हा तुम्हाला कोणी मागे सोडू शकणार नाही.”
दरम्यान, राहुल तेवतियाने आयपीएल २०२२ मध्ये खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये १४७.६२ च्या स्ट्राईक रेटने २१७ धावा केल्या. पंजाब किंग्जविरुद्धच्या एका सामन्यात त्याने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला होता. संपूर्ण हंगामात त्याने अशाच प्रकारे मोक्याच्या वेळी चांगली फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून देत गेला.
आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताचा संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मयंक अगरवाल ते निखत झरीन, फोटोंमध्ये पाहा कोणी कसा साजरा केला जागतिक योगा दिन






