भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामना खेळत नसला तरी त्याची नजर या सामन्यावर खिळलेली आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरने शतक झळकावले. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या अय्यरने ज्या पद्धतीने दबावाखाली फलंदाजी केली, त्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. अय्यरच्या शतकावर कर्णधार विराटनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि त्याचे अभिनंदन देखील केले आहे.
विराटला पहिल्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली असून पुढील महिन्यात होणाऱ्या मुंबई कसोटीत तो संघात परतणार आहे. त्यामुळे विराटच्या जागी श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले होते. अय्यरने कसोटी संघात या संधीचा चांगला उपयोग केला आहे. अय्यरने १७१ चेंडूत १०५ धावांची शानदार खेळी खेळली. त्याने त्याच्या खेळी दरम्यान १३ चौकार आणि दोन षटकार लागावले.
अय्यरच्या खेळीबाबत विराटने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याचा फोटो शेअर करत त्याचे अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले की, ‘तू शानदार खेळलास आणि तुझ्या पदार्पणाच्या कसोटीतील शतकासाठी तुझे खूप अभिनंदन.’
श्रेयस अय्यर गेल्या काही काळापासून मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये भारतीय संघाकडून खेळत आहे, पण त्याला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. अय्यर फलंदाजीला आला तेव्हा भारताने १०६ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. त्याने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या साथीने डाव सावरला आणि धावसंख्या १४५ धावांपर्यंत नेली. रहाणे बाद झाल्यानंतर अय्यरने रवींद्र जडेजासह भारताची धावसंख्या २८० च्या पुढे नेली. अय्यरच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ३०० हून अधिक धावा करता आल्या.
भारतीय संघाने पहिल्या डावात एकूण ३४५ धावा केल्या. अय्यरशिवाय शुभमन गिल आणि रवींद्र जडेजाने दमदार फलंदाजी करत अर्धशतकी खेळी साकारल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘शतकवीर’ श्रेयसने मैदानाबाहेर जाताना केले असे काही, संघाकडून मिळाले मोठे स्टँडिंग ओव्हेशन
कानपूर कसोटीत सपशेल फेल ठरलेल्या मयंकच्या शैलीत आहे ‘या’ गोष्टीची कमी, दिग्गजाने दाखवली उणीव