सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा व मालिकेतील अखेरचा सामनाही गमावला. भारतीय संघाच्या या पराभवाचे कारण ठरली फलंदाजी. यासह न्यूझीलंडने मुंबई कसोटीत ते करून दाखवले जे आजवर भारतात अन्य कोणताही संघ करू शकला नाही. भारत 1932 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि आतापर्यंत त्यांना घरच्या मैदानावर तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला नव्हता. मात्र टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील संघाने ही कामगिरी करुन दाखवली. न्यूझीलंडने मुंबई कसोटी सामना 25 धावांनी जिंकून मालिका 3-0 अशी जिंकली.
हा सामना जिंकण्यासाठी भारताला 147 धावांची गरज होती. त्यांच्याकडे जवळपास तीन दिवस बाकी होते. मात्र रविवारी (03 नोव्हेंबर) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात टीम इंडिया 121 धावांत गडगडली. या पराभवाने भारताच्या पाठीवर अनेक डाग पडले तर न्यूझीलंडने इतिहास रचून अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
मुंबई कसोटी सामन्यात बनले हे विक्रम
– तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ घरच्या मैदानावर क्लीन स्वीप होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2000 नंतर पहिल्यांदाच एखाद्या संघाने घरच्या मैदानावर भारताला क्लीन स्वीप केले आहे. 2000 साली दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला होता. याशिवाय घरच्या मैदानावर भारताचा संघ विरोधी संघाकडून क्लीन स्वीप होण्याची ही तिसरी वेळ आहे. 1980 मध्ये पहिल्यांदा इंग्लंडने भारताचा कसोटी मालिकेत 1-0 असा पराभव केला होता.
– 1983 नंतर प्रथमच भारताला घरच्या मैदानावर सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1958 ते 1980 पर्यंत भारताने घरच्या मैदानावर पाच वेळा सलग तीन कसोटी गमावल्या होत्या.
– न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदाच एका मालिकेत सलग तीन कसोटी सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर प्रथमच 200 किंवा त्यापेक्षा कमी धावांचे लक्ष्य गाठण्यात भारत अपयशी ठरत आहे. यापूर्वी टीम इंडियाने 31 वेळा 200 किंवा त्यापेक्षा कमी धावांच्या लक्ष्याचा सामना केला होता आणि ते पूर्ण केले होते.
हे दुसरे सर्वात कमी लक्ष्य होते जे टीम इंडियाला कसोटीत गाठता आले नाही. 1997 मध्ये ब्रिजटाऊन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध भारत 120 धावा करू शकला नव्हता, जे भारताला गाठता न आलेले सर्वात निच्चांकी लक्ष्य होते.
– न्यूझीलंडने वाचवलेले हे दुसरे सर्वात कमी लक्ष्य आहे. याआधी न्यूझीलंडने 1978 मध्ये वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या घरच्या कसोटी सामन्यातही 137 धावांची धावसंख्या वाचवली होती.
– 2024 मधील भारताचा घरच्या मैदानावरील हा चौथा कसोटी पराभव आहे. एका कॅलेंडर वर्षात घरच्या मैदानावर भारताचा हा सर्वाधिक वेळा झालेला कसोटी पराभव आहे. सन 1989 मध्येही भारताला चार पराभवांना सामोरे जावे लागले होते.
– रोहित शर्माचा कर्णधार म्हणून घरच्या मैदानावरील हा पाचवा पराभव आहे. यासह मायदेशात सर्वाधिक सामने गमावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. मन्सूर अली खान पतौडी नंबर-1 वर आहेत.
– एजाज पटेलने वानखेडेवर खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण 25 बळी घेतले आहेत. या मैदानावर भारताविरुद्ध कोणत्याही गोलंदाजाने घेतलेली ही सर्वाधिक विकेट्स आहेत. त्याच्यानंतर इयान बोथमचा क्रमांक लागतो ज्याने भारताविरुद्धच्या वानखेडे कसोटीत 22 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; पराभवानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “आम्ही आमचे सर्वोत्तम…”
IND vs NZ; भारताचा धुव्वा उडवत न्यूझीलंडने रचला इतिहास…!
पंजाबने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने झळकावले तुफानी शतक!