भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका संपत आली आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी (३१ जानेवारी) खेळला जाणार आहे. भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन हा केरळचाच असून होमग्राऊंडवर त्याची कामगिरी पाहण्यासाठी चाहते सज्ज आहे. यासाठी सामन्याच्या तिकीटांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली असून संजूचे विमानतळावर कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेले स्वागतही पाहण्याजोगे आहे.
संजूने भारतासाठी आतापर्यंत ५६ टी२० सामने खेळले आहेत. त्याचा हा होमग्राऊंडवरील पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना असल्याने चाहते तो पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. या सामन्यासाठी भारताचा संघ विमानतळावर पोहोचल्याचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट केला. त्यामध्ये सूर्यकुमार ज्याप्रकारे संजूचे स्वागत करत आहे ते आता चांगलेच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार आणि भारताचे इतर खेळाडू संघाच्या बससाठी विमानतळाच्या बाहेर पडत आहेत. तेव्हा सूर्यकुमार संजूला रस्ता दाखवताना दिसत असून ‘चेताला डिस्टर्ब करू नका’ असेही म्हणत आहे. सूर्यकुमारचे हे रुप पाहून संजूलाही हसू अनावर झाले आहे.
या मालिकेत संजूला पहिल्या चारही सामन्यांसाठी संघाच्या अंतिम अकरामध्ये घेतले होते. तो आगामी टी२० विश्वचषकासाठीही संघाचा मुख्य विकेटकिपर-फलंदाज आहे, मात्र सध्याच्या कामगिरीमुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तो न्यूझीलंडविरुद्धच्या चारही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. त्याने त्या सामन्यात १०, ६, ० आणि २४ धावांची कामगिरी केली.
संजूला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात लय गवसेल अशी आशा आहे. त्यातच होमग्राऊंडवर त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्यामुळे संघाला थोडा धीर येईल आणि त्याची संघातील आगामी विश्वचषकासाठीची जागाही पक्की होईल. तसेच विकेटकीपर-फलंदाज इशान किशनचा फॉर्म पाहता त्याचे दडपणही संजूवर असेल. कारण इशानही भारताच्या टी२० विश्वचषकाचा भाग आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२०मध्ये सामनाविजयी खेळी केली होती.
पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारताने पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. चौथ्या सामन्यात मात्र ५० धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे या मालिकेचे समीकरण ३-१ असे आहे. या मालिकेत दोन्ही संघाच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे.






