ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 5 वन-डे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. वनडे मालिका उद्यापासून(23 जानेवारी) सुरु होणार आहे.
या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा हे स्फोटक फलंदाज आहेत. तसेच शिखर धवन, एमएस धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक हे फलंदाज देखील आहेत. यामुळे भारताला फलंदाजीची तेवढी चिंता नाही. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या रॉस टेलरला लवकर बाद करण्याचे आव्हान असेल.
आयसीसी वन-डे क्रमवारीत कोहली पहिल्या तर टेलर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
2015च्या विश्वचषकानंतर कोहली वन-डेत सरासरीमध्ये अव्वल तर टेलर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच 2018ची सुरूवात झाल्यापासून टेलरने 98च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
मागील 13 सामन्यात टेलरने 92.34च्या सरासरीने 920 धावा केल्या आहेत. तो 20 शतके करणारा पहिलाच न्यूझीलंडचा खेळाडू आहे. श्रीलंका विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत त्याने 54, नाबाद 90 आणि 137 धावा केल्या होत्या. ही मालिका न्यूझीलंडने 3-0 अशी जिंकली होती.
कोहलीनेही मागील 13 सामन्यात 113च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत त्याने 3, 104 आणि 46 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनही चांगला फॉर्ममध्ये असून त्याने 2014च्या दौऱ्यात भारता विरुद्ध सलग पाच अर्धशतके केली होती.
न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला वन-डे सामना उद्या (23 जानेवारी) नेपियर येथे खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.30 या सामन्याला सुरूवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावल्यानंतर कर्णधार कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया
–कोहली, कोहली…! सोशल मीडियातून होतोय किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
–या ४ भारतीय क्रिकेटपटूंना २००४पासून मिळाले आहेत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पुरस्कार