भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा यानं टॉसच्या वेळी सांगितलं की, त्यानं प्लेइंग एलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. या सामन्यासाठी केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना ड्रॉप करण्यात आलं. पुण्याच्या मैदानावर फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार आहे, मात्र तरीही मॅनेजमेंटनं चायनामन कुलदीपला बाहेर करण्याचा निर्णय घेतला.
प्लेइंग एलेव्हनमध्ये कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला जागा मिळाली आहे. टीम मॅनेजमेंटनं सुंदरला संघात जागा देण्याबाबत स्पष्टीकरण दिलं की, न्यूझीलंडच्या टीममध्ये अनेक डावखुरे फलंदाज आहेत. सुंदर त्यांना आपल्या फिरकीनं अडचणीत आणू शकतो. मात्र सुंदरला संघात संधी देण्यासाठी कुलदीप यादवला बळीचा बकरा बनवण्यात आलंय. येथे रवींद्र जडेजाला देखील बाहेर बसवता आलं असतं, मात्र मॅनेजमेंटनं तसं केलं नाही. हे पाहून असंच वाटतं की, कुलदीप यादवला विनाकारण प्लेइंग एलेव्हन मधून बाहेर केलं जातं. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत देखील असंच काहीसं झालं होतं.
बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेच्या दोन्ही सामन्यांत तीन वेगवान गोलंदाजांना खेळवता यावं, यासाठी कुलदीप यादवला संधी मिळाली नाही. कानपूर कुलदीपचं घरचं मैदान आहे. मात्र तेथे खेळल्या गेलेल्या कसोटीतही त्याला बेंचवर बसावं लागलं. टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय चाहत्यांच्या समजण्यापलीकडचा आहे.
आता पुणे कसोटीतून कुलदीप यादवला बाहेर का केलं गेलं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. बोललं जात आहे की, संघाला फलंदाजीमध्ये अधिक पर्याय हवे आहेत. या कारणामुळे वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग एलेव्हनमध्ये आणण्यात आलं. आता तो या सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्कोरसह झिम्बाब्वेनं बनवले अनेक रेकॉर्ड!
IND vs NZ: अश्विनने पहिल्याच सत्रात इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला टाकले मागे
टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक, उपांत्य फेरीत अफगाणिस्तानशी सामना