भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना शुक्रवारी (२३ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाणार आहे. या ठिकाणी आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला गेला आहे. त्यामध्ये फलंदाजांची की गोलंदाजांची जादू चालली हे पाहू.
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत पहिला आणि शेवटचा सामना २०२३मध्ये खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात भारत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळला. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा रिंकू सिंगने केल्या होत्या. त्याने २९ चेंडूत ४६ धावा केल्या होत्या.
तसेच यशस्वी जायसवालच्या ३७ आणि जितेश शर्माच्या ३५ धावाच्या खेळीवर भारताने २० षटकांत ९ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना २० धावांनी जिंकला होता. त्यामध्ये अक्षर पटेलच्या फिरकीने ऑस्ट्रेलिया हैरान झाली होती. त्याने ४ षटकात १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला. त्याच्या या कामगिरीची पुनरावृत्ती न्यूझीलंडविरुद्ध होणार की नाही हे सांगणे कठीण आहे.
अक्षरची रायपूरमधील कामगिरी पाहता तो न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात खेळणे आवश्यक आहे. तो नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याचे उर्वरित चौथे षटक अभिषेक शर्माने टाकले होते. आता तो दुसऱ्या सामन्यासाठी फिट आहे का नाही हे सांगणे अशक्य आहे.
तसेच अक्षर भारताच्या टी२० विश्वचषक संघाचा भाग आहे. यामुळे त्याची दुखापत लवकर बरी झाली पाहिजे, अशी भारतीय संघ आणि चाहत्यांची इच्छा आहे. भारतासाठी आनंदाची बाब म्हणजे स्फोटक फलंदाज तिलक वर्माही दुखापतीतून सावरत आहे. तोही टी२० विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे त्याच्या सोशल मीडियाच्या अपडेटवरून कळाले.
ही स्पर्धा भारत श्रीलंकेसोबत आयोजित करणार असून पहिला सामना ७ फेब्रुवारीला कोलंबो येथे खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तान – नेदरलॅंड्स यांच्यात रंगणार आहे.






