---Advertisement---

IND vs NZ: टीम इंडिया सरस की न्यूझीलंड वरचढ? पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 6:40 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 21 जानेवारीपासून सुरू होत असून, या मालिकेने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारताला 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता टी-20 स्वरूपात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे ही मालिका केवळ विजयासाठी नाही, तर प्रतिष्ठेसाठीही महत्त्वाची ठरणार आहे.

न्यूझीलंड संघ वनडे मालिकेतील यशाची लय कायम राखत टी-20 मालिकाही नावावर करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, टीम इंडियासमोर वनडेतील पराभवाची परतफेड करत टी-20 मालिकेत वर्चस्व सिद्ध करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी मालिकेपूर्वी कसून सराव करत कोणतीही कसर ठेवलेली नाही.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 25 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 14 सामने जिंकत आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने 10 वेळा भारताला पराभूत केलं असून, एक सामना टाय झाला आहे. एकूण आकडेवारी पाहता भारतच सरस असल्याचं दिसून येतं.

मायदेशात खेळलेल्या टी-20 सामन्यांमध्ये भारताचं वर्चस्व स्पष्ट दिसतं. भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 7 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडला भारतात केवळ 4 विजय मिळवता आले आहेत. मात्र, तटस्थ मैदानावर भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात तटस्थ ठिकाणी खेळवण्यात आलेले दोन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.

ही पाच सामन्यांची टी-20 मालिका आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी दोन्ही संघांसाठी शेवटची मोठी संधी आहे. न्यूझीलंडने प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताला वनडे मालिकेत नमवून आत्मविश्वास मिळवला आहे. तर भारतावर मालिकेतील पराभवानंतर दबाव वाढलेला आहे.

आता टीम इंडिया टी-20 मालिकेत दमदार कामगिरी करत वनडेतील पराभवाचा हिशोब चुकता करते का, की न्यूझीलंड पुन्हा एकदा भारतीय संघावर मात करतो. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अंतिम निकाल पाचव्या सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---