भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया अवघ्या 46 धावांत गडगडली. यासह भारतीय संघाने घरच्या भूमीवर कसोटीत सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट होण्याचा लाजिरवाणा विक्रम केला.
मात्र, पहिल्या डावात न्यूझीलंडने केलेल्या 402 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. सर्फराज खानच्या 150 धावा आणि रिषभ पंतच्या 99 धावांच्या जोरावर टीम इंडिया दुसऱ्या डावात 462 धावांपर्यंत पोहचली. याआधी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने 52 आणि विराट कोहलीने 70 धावा केल्या.
चौथ्या दिवशी भारतीय संघाला चांगली सुरुवात झाली. पंत आणि सर्फराज यांनी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर संपूर्ण संघच कोलमडला. न्यूझीलंडने भारतीय डावाच्या 80 व्या षटकानंतर नवीन चेंडू घेतला. त्यानंतर संघाने 15.2 षटकात सात फलंदाज बाद केले. भारताने शेवटच्या 6 विकेट 29 धावांत गमावल्या. अशाप्रकारे भारताने 462 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले.
चौथ्या दिवशी भारतीय संघाने 462 धावा करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. वास्तविक, भारतीय संघ पहिल्या डावात 50 धावा देखील करू शकला नाही. पण दुसऱ्या डावात 450 पेक्षा जास्त धावा केल्या. अशाप्रकारे, टीम इंडिया कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 50 पेक्षा कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाल्यानंतर दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करणारा संघ बनला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 100 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. 1924 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 30 धावांत ऑलआऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 390 धावा केल्या होत्या. आता भारताने दक्षिण आफ्रिकेचा हा विक्रम मागे टाकला आहे.
कसोटीतील पहिल्या डावात 50 पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात सर्वोच्च धावसंख्या बनवणारे संघ
462 – भारत विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरू, 2024 (पहिला डाव: 46)
390 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, 1924 (पहिला डाव: 30)
275 – न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, 2013 (पहिला डाव: 45)
267- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2013 (पहिला डाव: 49)
184 – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 1887 (पहिला डाव: 45)
हेही वाचा-
आधी वरिष्ठ, नंतर महिला, आता युवांनी पाकिस्तानला चिरडले; वर्षाभरात भारताने PAK ला इतक्यांदा हरवले
IND A vs PAK A; भारताचा पकिस्तानवर 7 धावांनी शानदार विजय!
IND vs NZ; “लहानपणापासून हे माझे स्वप्न” शानदार शतक झळकावल्यानंतर स्टार खेळाडूने दिली प्रतिक्रिया