बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडनं भारताचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी खूपच सरासरी दिसली. टीम इंडिया पहिल्या डावात केवळ 46 धावाच करू शकली. भारतानं जरी दुसऱ्या डावात 462 धावा केल्या, तरी पहिल्या डावातील कमी धावसंख्येमुळे न्यूझीलंडला केवळ 107 धावांचं लक्ष्य मिळालं. न्यूझीलंडनं केवळ दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. सामन्यानंतर रोहित शर्मानं आपल्या खेळाडूंबद्दल फारसं काही सांगितलं नसलं तरी येत्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. या कसोटीतून कोणते खेळाडू बाहेर बसू शकतात, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
(1) केएल राहुल – केएल राहुलकडून घरच्या परिस्थितीत भारताला विजय मिळवून देणं अपेक्षित होतं. मात्र, पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्यानं केवळ 12 धावा केल्या. दुसरीकडे राहुलचा प्रतिस्पर्धी सरफराज खाननं दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून आपली दावेदारी मजबूत केली आहे. दरम्यान, आता शुबमन गिलही तंदुरुस्त आहे. सामना संपल्यानंतरही रोहितनं हे स्पष्ट केलं. अशा स्थितीत आता दुसऱ्या कसोटीत राहुलला बेंचवर बसवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(2) कुलदीप यादव – कुलदीप यादव बंगळुरूमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांविरुद्ध खूपच सरासरी दिसला. रोहित शर्माने रविचंद्रन अश्विनपेक्षा त्याच्यावर अधिक विश्वास दाखवला होता. मात्र कुलदीपला फारसं यश मिळालं नाही. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर त्याला 33च्या सरासरीनं फक्त तीन विकेट मिळाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानं सामन्यात 5.35 च्या इकॉनॉमीनं 99 धावा दिल्या. अशा स्थितीत आता पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कुलदीपच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. फिरकी गोलंदाजीशिवाय अक्षर फलंदाजीतही चांगलं योगदान देऊ शकतो, हे महत्त्वाचं.
(3) मोहम्मद सिराज – वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं देशांतर्गत कसोटी सामन्यांमध्ये विशेष काही केलेलं नाही. घरच्या मैदानावर सिराजनं 23 डावांमध्ये 38.95 ची सरासरी आणि 62.63 च्या स्ट्राईक रेटने केवळ 19 विकेट घेतल्या. त्यानं पाचव्या दिवशी नक्कीच चांगली गोलंदाजी केली, परंतु संपूर्ण कसोटीत त्याची एकूण कामगिरी निराशाजनकच राहिली. आता भारताकडे आकाशदीपच्या रूपानं चांगला पर्याय आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यानं शानदार गोलंदाजी केली. यामुळे पुणे कसोटीत त्याला सिराजच्या जागी संधी मिळू शकते.
हेही वाचा –
रिषभ पंत पुणे कसोटीतून बाहेर? रोहित शर्मानं दिली मोठी हिंट; जाणून घ्या काय म्हणाला हिटमॅन?
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? प्रमुख कारणं जाणून घ्या
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताची चिंता वाढली, WTC गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का