यंदाच्या महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या हाती निराशा लागली. भारताला न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतीरिक्त कोणत्याही खेळाडूला 15+ धावा करता आले नाही. ईडन कार्सनने टीम इंडियाला सुरुवातीचा धक्का दिला. कोणत्याही विकेटसाठी मोठी भागीदारी न होणे हे या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात न्यूझीलंडने 15 षटकांत 109 धावा केल्या होत्या. मात्र शेवटच्या 5 षटकांत कर्णधार सोफी डेव्हाईन आणि इतर फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी केली. कर्णधार सोफीने 36 चेंडूत 57 धावांची खेळी करत किवी संघाला 160 धावांपर्यंत मजल मारून दिली. टीम इंडियाकडून रेणुका सिंगने 2, तर अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. कारण संघाने 42 धावांपर्यंत मजल मारत असतानाच आघाडीच्या तिन्ही फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. मधल्या फळीत जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष याही अनुक्रमे 13 आणि 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्या. स्कोअर 75 झाला तोपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारताने पुढच्या 27 धावांत उर्वरित 5 विकेट गमावल्या.
न्यूझीलंडच्या रोझमेरी मायर आणि लिया ताहुहू यांनी गोलंदाजीत कहर केला. रोझमेरीने 4 षटकात 19 धावा देत 4 विकेट्स घेतल्या तर दुसरीकडे लियानेही 3 बळी घेतले. आता टीम इंडियाला पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध 6 ऑक्टोबरला खेळायचा आहे. भारताने आता पहिला सामना 58 धावांनी हरला आहे, तर पाकिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव केला आहे.
हेही वाचा-
भारतासाठी सर्वाधिक टी20 सामने जिंकणारे टाॅप-5 कर्णधार
भारतीय संघ क्षेत्ररक्षणात मजबूत होणार! भारताच्या फिल्डिंग कोचने आखली नवी योजना
IND vs BAN; टी20 सामन्यावर धोका! पोलिसांचा कडक बंदोबस्त, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण