---Advertisement---

‘या’ 5 धुरंधरांमुळेच भारताने पाकिस्तानला दिला धोबीपछाड, नावांसह कामगिरीही पाहा

On: मंगळवार, सप्टेंबर 12, 2023 11:33 AM
Team-India
---Advertisement---

भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर- 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर एकतर्फी विजय मिळवला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पाकिस्तानला 228 धावांनी धोबीपछाड दिला. भारताचा हा वनडे क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा विजय होता. हा विजय मिळवून देण्यात भारताच्या 5 धुरंधरांचे मोलाचे योगदान राहिले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात अवघ्या 2 विकेट्स तब्बल 356 धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान पार करताना बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ 32 षटकात 128 धावांवरच पत्य्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. पाकिस्तानच्या 8 विकेट्स पडल्या, पण नसीम शाह आणि हॅरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानला सर्वबाद मानले गेले आणि भारताने हा सामना 228 धावांनी विजय मिळवला.

भारताच्या विजयात मोलाचे योगदान देणारे 5 हिरो
1. विराट कोहली
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने 94 चेंडूंचा सामना करताना 3 षटकार आणि 9 चौकारांचा पाऊस पाडत सर्वाधिक नाबाद 122 धावा केल्या. विराटला या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. विराटने त्याच्या वनडे कारकीर्दीतील 47वे शतक साकारत विक्रमांचा पाऊसही पाडला. त्याने 13000 वनडे धावाही पूर्ण केल्या. तो भारताच्या विजयाचा अव्वल क्रमांकाचा हिरो ठरला.

2. केएल राहुल
जवळपास 6 महिने भारतीय संघात परतणाऱ्या केएल राहुल (KL Rahul) याने शतक ठोकत शानदार पुनरागमन केले. राहुलने यावेळी 106 चेंडूंचा सामना करत 2 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 111 धावा केल्या. विराटसोबत त्याने नाबाद 233 धावांची विक्रमी भागीदारीही रचली. भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात राहुलने मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान त्याने एक झेलही पकडला.

3. कुलदीप यादव
चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने पाकिस्तानच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. त्याने अवघ्या 8 षटकात फक्त 25 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तो आशिया चषकातील सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या अर्शद अय्यूब यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय गोलंदाज बनला. कुलदीपने 35 वर्षांनंतर ही कामगिरी करून दाखवली.

4. शुबमन गिल
भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) या यादीत आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे जागा मिळवण्यात यशस्वी झाला. त्याने आधी फलंदाजी करताना 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. त्याने कर्णधार रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचत भारताला शानदार सुरुवात करून दिली. त्यानंतर त्याने जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीवर इमाम उल हक याचा शानदार झेल पकडला.

5. रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हादेखील भारताच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या हिरोंमध्ये सामील आहे. रोहितने 49 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडत 56 धावा केल्या. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील 50वे अर्धशतक होते. रोहितने षटकार मारण्याचाही विक्रम केला. गिलसोबत त्याने शानदार सलामी भागीदारी रचली. त्यानंतर त्याने शानदार नेतृत्व करत पाकिस्तानला लवकर सर्वबाद करण्यासाठी यशस्वी योजनाही आखली.

आता भारतीय संघाचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध 12 सप्टेंबर रोजी आर प्रेमदासा स्टेडिअम (R Premdasa Stadium) येथे 3 वाजता सुरू होणार आहे. (ind vs pak asia cup 2023 india 5 hero of the match colombo r premdasa stadium know here)

हेही वाचा-
श्रीलंकेविरुद्ध खेळणार का? पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्यानंतर खुद्द विराटनेच केला खुलासा
रोहितही बनला ‘किंग’ कोहलीचा फॅन; सामन्यानंतर कौतुक करताना थकला नाही कॅप्टन, म्हणाला, ‘विराटची खेळी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---