आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (१५ फेब्रुवारी) महामुकाबला होणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी उत्तम सराव केला आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक तर चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय फलंदाजांनी कसे खेळावे याचे तर्क-वितर्क लावले जात असताना कर्णधार सूर्यकुमार यादव याचा गोलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारताचा कर्णधार सूर्यकुमारने नेटमध्ये फलंदाजीबरोबर गोलंदाजीचा देखील सराव केला. यावेळी त्याने तारिकसारखा चेंडू टाकण्याची ऍक्शन करत गोलंदाजी केली. त्याने ही गोलंदाजी रिंकू सिंगला केली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शनिवारी (१४ फेब्रुवारी) भारतीय संघाने नेट सेशन पूर्ण केले, मात्र पावसामुळे थोडासा व्यत्यय आला होता. आजही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, मात्र सर्वांना वाटते हा सामना व्हावा. सूर्यकुमारही बॉलिंग पाहता भारतीय खेळाडूंमध्ये तारिकबाबत भीती नाही, असे दिसून येते.
उस्मानच्या गोलंदाजीबाबत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला, “मी त्याची गोलंदाजी आयएलटी२० मध्ये पाहिली आहे. जेव्हाही त्याला उपांत्या आणि अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा-तेव्हा त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे. त्याच्याकडे बाकी स्पिनर्सपेक्षा अधिक वेगळे कौशल्य आहे. लोक त्याच्या स्टॅंड इन डिलीव्हर ऍक्शनबाबत बोलत आहे, मात्र ते करणे काही सोपे काम नाही. मोठ्या मैदानांवर आणि संथ गतीच्या खेळपट्टीवर त्याच्याविरुद्ध खेळणे कठीण आहे.”
या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने अभिषेक शर्माच्या सामन्यातील उपस्थितीबाबत महत्वाचे अपडेट्स दिले. तो म्हणाला, “पाकिस्तानला वाटते अभिषेकने या सामन्यात खेळावे तर तो खेळणारच.”
अभिषेकही ठिक असून त्याने नेटमध्ये अधिक काळ सरावही केला होता. त्याचे अंतिम अकरामध्ये येण्याने संजू सॅमसनला पुन्हा एकदा बाकावर बसावे लागणार आहे. कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उत्तम असल्याचे म्हटले जात आहे. अशातच कुलदीप यादवला संधी मिळणार का, हे कळेल. तसेच हा सामना त्याच खेळपट्टी होणार आहे, ज्यावर झिम्बाब्वे-ऑस्ट्रेलिया सामना खेळला गेला.






